मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Data Privacy : महाराष्ट्रासह दोन राज्यातील नागरिकांची डेटाविक्री; पोलिसांकडून दोघांना अटक

Data Privacy : महाराष्ट्रासह दोन राज्यातील नागरिकांची डेटाविक्री; पोलिसांकडून दोघांना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 26, 2022 11:29 AM IST

Data Privacy Issues : आरोपींनी महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांचा डेटा गोळा करून कर्जवाटप करणाऱ्या एजंटांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Personal Data Sold Case
Personal Data Sold Case (HT_PRINT)

Personal Data Sold Case : महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील नागरिकांचा डेटा गोळा करून तो कर्जवाटप करणाऱ्या संस्थांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी नागरिकांची वैयक्तिक माहिती कर्ज वसुली करणाऱ्या एजंट्सना मासिक आणि वार्षिक सब्क्रिब्शन्सवर विकल्याची घटना समोर आल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करून एका पोर्टलद्वारे खाजगी कंपन्यांना विकली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यात व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, पत्ता, जन्मतारीख आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा करून आरोपी निखिल आणि राहुल एलिगाटी यांनी http://www.tracenow.co आणि http://www.fonivotech.com या वेबसाईट्सवर संकलित केली होती. त्यानंतर त्यांनी ठराविक किंमतीत कर्ज देणाऱ्या आणि कर्जवसूली करणाऱ्या संस्थांना नागरिकांचा वैयक्तिक डेटा विक्री केली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इतकी संवेदनशील माहिती कुठून मिळवली, त्यांनी डेटा कुठून गोळा केला, याची माहिती अजून समोर आलेली नाही. आरोपींनी काही सरकारी वेबसाईट्स हॅक केली होती का?, किंवा सरकारी कर्मचाऱ्यानं त्यांना ही माहिती उपलब्ध करून दिली आहे?, या सर्व बाबींची चौकशी केली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

IPL_Entry_Point