मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pariksha Pe Charcha : परीक्षेवरील चर्चेच्या आडून शाळकरी मुलांमध्ये भाजपचा प्रचार; काँग्रेसचा आरोप

Pariksha Pe Charcha : परीक्षेवरील चर्चेच्या आडून शाळकरी मुलांमध्ये भाजपचा प्रचार; काँग्रेसचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 06:03 PM IST

Congress on Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातील भाजपच्या घुसखोरीवर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे.

Pariksha Pe charcha
Pariksha Pe charcha (ANI/PIB)

Congress on Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी घेतलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या हेतूवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. 'या सरकारी कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भाजप शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसनं केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपच्या या कार्यक्रमावर जोरदार टीका केली. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम देशभरातील शाळांमध्ये दाखवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ग्रामीण भागात वीज व इंटरनेट सुविधेचा अभाव असतानाही मुख्याध्यापकांना हा कार्यक्रम मुलांना दाखवण्याचं फर्मानच सरकारनं काढलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानंही तसे निर्देश दिले होते. पंतप्रधानांचा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठी शाळांना वेठीस धरण्यात आलं. सरकारी कार्यक्रम असूनही भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबतच सहभागी होण्याची काय गरज होती? शाळकरी मुलांमध्ये राजकीय नेत्यांची ही लूडबुड काय कामाची? पंतप्रधानांचे धडे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, का भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी? असे प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.

'भाजप राजकारणासाठी व सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो. आता त्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी शाळकरी मुले व शाळांचा वापर सुरू केला आहे. विद्यार्थी दशेतील या मुलांना ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपचे राजकीय धडे गिरवायला लावणं हे या मुलांवर अन्याय करणारं आहे. अशा सरकारी कार्यक्रमात भाजपचे नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांसह सहभाग घेऊन भाजपचा प्रचार व प्रसार करताना त्यांनी मुलांच्या भवितव्याचा तरी विचार करायला हवा, असा संताप लोंढे यांनी व्यक्त केला.

IPL_Entry_Point

विभाग