मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: नितीश कुमार यांचा निर्णय शहाणपणाचा; शरद पवारांनी उदाहरणं देऊन केलं परफेक्ट विश्लेषण

Sharad Pawar: नितीश कुमार यांचा निर्णय शहाणपणाचा; शरद पवारांनी उदाहरणं देऊन केलं परफेक्ट विश्लेषण

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 10, 2022 12:36 PM IST

Sharad Pawar on Nitish Kumar: भाजपसोबतची युती तोडण्याच्या नितीश कुमार यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar - Nitish Kumar
Sharad Pawar - Nitish Kumar

Sharad Pawar on Nitish Kumar: बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला दिलेल्या दणक्यानंतर देशभर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय वर्तुळात भाजपच्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीश कुमार यांचा निर्णय शहाणपणाचा असल्याचं म्हटलं आहे.

बारामती इथं ते पत्रकारांशी बोलत होते. ‘भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी एक भाषण केलं होतं. प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष शिल्लक राहील असं ते स्पष्टपणे म्हणाले होते. नितीश कुमार यांची तक्रार हीच आहे, असं पवार म्हणाले. 'भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या सोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. पंजाबमध्ये अकाली दल हा पक्ष त्यांच्यासोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता सोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपल्यात जमा आहे. महाराष्ट्रात शिवसेना गेली अनेक वर्षे भाजपसोबत होती. शिवसेनेत फूट पाडून हा पक्ष दुबळा कसा करता येईल अशी आखणी आता भाजपनं केली आहे. त्याला एकनाथ शिंदे यांच्यासारख्या काही लोकांनी मदत केली. एकेकाळच्या मित्रानंच शिवसेनेवर हा आघात केला आहे, याकडं पवार यांनी लक्ष वेधलं.

एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा!

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यात सध्या मूळ पक्ष आणि पक्ष चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. त्यावरही पवार यांनी भाष्य केलं. 'एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा मी स्वत:चा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्हं आम्ही मागितलं नाही. विनाकारण वादविवाद वढवणं योग्य नाही. धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले.

IPL_Entry_Point