मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नांदेड : दोन महिन्याच्या संसाराचा करूण अंत; नवविवाहित जोडपं मध्यरात्री शेतात गेलं अन् नेमकं काय घडलं?

नांदेड : दोन महिन्याच्या संसाराचा करूण अंत; नवविवाहित जोडपं मध्यरात्री शेतात गेलं अन् नेमकं काय घडलं?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 24, 2024 09:15 PM IST

Nanded News : मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील आखाड्यावरील लोखंडी ॲंगलला गळफास घेत नवविवाहित दाम्पत्याने आपले आयुष्य संपवले आहे.

नांदेडमध्ये नवविवाहित जोडप्याची आत्महत्या
नांदेडमध्ये नवविवाहित जोडप्याची आत्महत्या

Nanded news  : दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने (Newly married couple) टोकाचं पाऊल उचलत आपल्या सुखी संसाराचा करून अंत केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास  शेतातील आखाड्यावरील लोखंडी ॲंगलला गळफास घेत नवविवाहित दाम्पत्याने आपले आयुष्य संपवले आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील कळकावाडी येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या नवदाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

नामदेव उद्धव केंद्रे (वय २१) आणि कोमल नामदेव केंद्रे (वय १९) असं मृत नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे याचा विवाह शेल्लाळी येथील किशन गित्ते यांची मुलगी कोमल हिच्याशी झाला होता. दोघांचा विवाह कळकावाडी येथे याच वर्षी १७ फेब्रुवारी रोजी झाला. दोघांनीही आपल्या सुखी संसाराची आनंदाने सुरुवात केली होती. दोघांच्या हसत्या खेळत्या संसाराचा इतका भयानक शेवट होईल असे कोणालाही वाटलं नसेल. 

दरम्यान, मंगळवारी (२३ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास नामदवे व कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले. तेथे घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून दोघांनी आपले जीवन संपवले. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याचे लटकलेले मृतदेह आढळून आले.

मंगळवारी सकाळी शेतात आलेल्या नातेवाईकांना दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

या घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल जुन्ने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेहावर कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत नामदेवचे वडील उद्धव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने केंद्रे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

IPL_Entry_Point

विभाग