Nitin Gadkari in Pusad : लोकसभा निवडणुकीचा प्रचाराच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दुपारी यवतमाळमध्ये भोवळ आल्याचं समोर आलं आहे. स्टेजवर भाषण करतानाच हा प्रकार घडला. त्यांच्यावर तातडीनं प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक समजले जाणारे नितीन गडकरी हे स्वत: नागपूरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या मतदारसंघात मतदान झालं. त्यानंतर आता ते देशभरात एनडीए व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
गडकरी हे आज दुपारी यवतमाळमधील पुसद इथं प्रचारसभेला गेले होते. महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गडकरी यवतमाळमध्ये होते. व्यासपीठावर भाषण देत असतानाच त्यांना भोवळ आली. हे लक्षात येताच बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांनी व नेत्यांनी त्यांना सावरलं.
गडकरी यांना भोवळ आल्यानं व्यासपीठावर उपस्थित लोकांची तारांबळ उडाली. लगेचच त्यांना पाणी देण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बरं वाटलं. काही वेळानंतर त्यांनी व्यासपीठावर येऊन भाषणही केल्याचं समजतं. अति उष्णतेमुळं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.
या घटनेनंतर नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीट केलं आहे. ‘पुसद येथील सभेत उष्णतेमुळं अस्वस्थ वाटलं. मात्र आता मी पूर्णपणे फिट असून पुढील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी वरुडला रवाना होत आहे. आपली आपुलकी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद,’ असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नितीन गडकरी यांना भर कार्यक्रमात भोवळ येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१८ साली राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत झाल्यानंतर खुर्चीवर बसत असताना गडकरी यांना भोवळ आली होती. त्यानंतर २०१९ साली शिर्डीतील एका कार्यक्रमात ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर, २०२२ च्या नोव्हेंबर महिन्यात पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात त्यांना भोवळ आली होती. भाषण सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची तब्येत बरी झाली होती.
संबंधित बातम्या