मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सत्तारांच्या राजीनाम्यावर विरोधक सायलेंट मोडवर; मुख्यमंत्र्यांशी समझौता झाल्याच्या चर्चांना उधाण

सत्तारांच्या राजीनाम्यावर विरोधक सायलेंट मोडवर; मुख्यमंत्र्यांशी समझौता झाल्याच्या चर्चांना उधाण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 08:47 AM IST

Washim Land Scam Case : वाशिम जिल्ह्यातील शेकडो एकर गायरान जमीन एका खाजगी व्यक्तीला बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप करत विरोधकांनी कृषिमंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Abdul Sattar Resignation News
Abdul Sattar Resignation News (HT)

Abdul Sattar Resignation News : वाशिम जिल्ह्यातील १५० कोटी रुपयांची गायरान जमीन एका खाजगी व्यक्तीला बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी विधानसभेचं कामकाज रोखून धरणारे विरोधक मंगळवारी मात्र या प्रकरणावर सायलेंट मोडवर होते. याशिवाय संपूर्ण दिवसाच्या कामकाजात सत्ताधाऱ्यांकडून अथवा विरोधकांकडून सत्तारांच्या जमीन घोटाळा प्रकरणाबाबत अवाक्षरही उच्चारलं न गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं आता सत्तारांना आशिर्वाद देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समझौता झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सोमवारी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जमीन घोटाळा प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. सत्तारांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्टानंही ताशेरे ओढल्याचं सांगत विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. याशिवाय काही वेळ सभागृहाचं कामकाजही रोखून धरलं. सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधकांच्या गोंधळामुळं सोमवारी सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आल्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं.

त्यानंतर मंगळवारी सीमाप्रश्नी ठराव झाल्यानंतर किंवा प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत सत्तारांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांनी जमीन घोटाळ्याचा मुद्दा आणि सत्तारांच्या राजीनाम्याचा विषय बासनात गुंडाळून ठेवत त्यावर मौन पाळणं पसंत केलं. परिणामी सत्तारांच्या राजीनाम्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समझौता झाल्याची काल दिवसभर चर्चा होती.

वाशिममधील जमीन घोटाळ्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी कृषिमंत्री सत्तार यांच्या विरोधात विधानसभवनाच्या पायऱ्यांवर अनोखं आंदोलन केलं होतं. त्यात खोके लुटा, कधी गायरान लुटा, शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान, भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या आणि भूखंडाचे श्रीखंड खाणारे राजीनामा द्या अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

IPL_Entry_Point