मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, चौघांना अटक

शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, चौघांना अटक

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 20, 2022 08:17 AM IST

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी १०० कोटी रुपयांची मागणी केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - पीटीआय)

Maharashtra Cabinet: महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिवसेनेच्या ४० बंडखोरांसह ५० आमदारांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. यातच आता धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. एका आमदाराकडे मंत्रिपद देण्याच्या नावाखाली १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मंत्रिपदासाठी अनेक आमदार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर फेऱ्या मारत आहेत. याचाच फायदा घेत चार जणांनी मंत्रिपद देण्याच्या नावावर ३ आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर आरोपींनी आमदारांना फोन करून ते दिल्लीवरून आल्याचंही सांगितलं.

वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचा बायोडाटा मागितला आहे असे सांगत आमदारांशी आरोपींनी दोन ते तीन वेळा चर्चा केली. तसंच मंत्रिपद हवं असेल तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील असंही सांगितलं. याशिवाय आरोपींनी १७ जुलैला ओबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेटही घेतल्याची बाब समोर येत आहे.

आमदारांसोबत बैठकीत मंत्रिमंडळात स्थान हवं असेल तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील असं सांगण्यात आलं. तसंच यातील २० टक्के रक्कम आधी आणि उरलेली मंत्रिपद मिळाल्यानंतर द्यावी लागेल असंही आरोपींनी आमदारांना सांगितलं होतं. त्यानंतर आरोपींनी सोमवारी आमदारांना नरीमन पॉइंटला भेटण्यासाठी बोलावलं होतं.

दरम्यान, मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून चौकशीवेळी आणखी तिघांची नावे समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point