Maharashtra weather update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदललं असून दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग जमा होऊन पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या शिडकावामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळं पिकांचे मोठं नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने (Weather update ) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसासह काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुन्हा (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात प्रति तास ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बुलडाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शनिवारी व रविवारी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार सोमवारी मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला दिला. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. त्याचबरोबर मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले. जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची (४२. ७ अंश सेल्सिअस) नोंद झाली. या व्यतिरिक्त चंद्रपूर (४२.६ अंश सेल्सिअस), वाशीम (४२.६ अंश सेल्सिअस), जेऊर ४२.५ (अंश सेल्सिअस), धुळे (४२.० अंश सेल्सिअस), मालेगाव (४२ अंश सेल्सिअस),अकोला (अंश ४२ सेल्सिअस) आणि वर्ध्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर,नाशिक येथे २१.६ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होते.
संबंधित बातम्या