मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maha Vikas Aghadi: Cm Uddhav Thackeray Redistributes Ministries Of Rebel Ministers

बंडखोर मंत्र्यांना दणका, कार्यभार काढला; शिंदेंचं खातं कोणाकडं?

Uddhav Thackeray - Eknath Shinde
Uddhav Thackeray - Eknath Shinde
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Jun 27, 2022 03:03 PM IST

Uddhav Thackeray: शिवसेना व महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून गुवाहाटीत गेलेल्या मंत्र्यांकडील खात्यांचा कार्यभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य मंत्र्यांकडं सोपवला आहे.

शिवसेनेच्या व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून गेल्या सहा दिवसांपासून गायब असलेल्या मंत्री व राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दणका दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांकडील कार्यभार काढून घेतला असून तो अन्य मंत्र्याकडं सोपवला आहे. जनहिताची कामं अडकून पडू नये, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ नुसार अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळं आपली कामं पार पाडणं शक्य नसेल, त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येतात. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल, तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येतात, अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडं देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर, दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खातं तसंच, संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खात्याचा कार्यभार शंकरराव गडाख यांच्याकडं सोपवण्यात आला आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खातं आदित्य ठाकरे यांच्याकडं देण्यात आलं आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

  • शंभूराज देसाई यांच्याकडील गृह (ग्रामीण) खात्याचा कार्यभार संजय बनसोडे यांच्याकडं वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचा कार्यभार विश्वजित कदम यांना तर, पणन खात्याचा कार्यभार सतेज पाटील यांच्याकडं देण्यात आला आहे.
  • राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडं, वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग खातं प्राजक्त तनपुरे यांच्याकडं, अन्न व औषध प्रशासन सतेज पाटील यांच्याकडं तर सांस्कृतिक कार्य हे खातं राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडं देण्यात आलं आहे.
  • अब्दुल नबी सत्तार यांच्याकडील महसूल खात्याचा कार्यभार प्राजक्त तनपुरे यांच्याकडं, ग्राम विकास व बंदरे, खार जमिनी विकास खात्याचा कार्यभार सतेज पाटील यांच्याकडं तर, विशेष सहाय्य खात्याचा कार्यभार आदिती तटकरे यांच्याकडं देण्यात आला आहे.
  • राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी आदिती तटकरे, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार खात्याची जबाबदारी सतेज पाटील, महिला व बाल विकास खात्याची जबाबदारी संजय बनसोडे व इतर मागास बहुजन कल्याण खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.