मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha Cabinet Expansion: मुंबईत शिंदे फडणवीसांकडे २० मराठी आमदार पण एकमेव मंत्री, तोसुद्धा अमराठी

Maha Cabinet Expansion: मुंबईत शिंदे फडणवीसांकडे २० मराठी आमदार पण एकमेव मंत्री, तोसुद्धा अमराठी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 09, 2022 08:42 PM IST

Maharashtra Cabinet Expansion: मुंबई मराठी माणसाची राहूच नये अशा मानसिकतेतून हे सरकार काम करत असल्याचा आरोप होतोय. 'मविआ' च्या मंत्रिमंडळात मुंबईत चार मराठी मंत्री होते, आता मात्र एकच मंत्री तोसुद्धा अमराठी आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईत मराठी माणसाला डावलल्याचा आरोप
मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईत मराठी माणसाला डावलल्याचा आरोप (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Cabinet Expansion: महिन्याभरापासून रखडलेला शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. नव्या सरकारमध्ये १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. मात्र या शपथविधीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना म्हटलं की, मुंबई ही मराठी माणसाची राहूच नाये अशा मानसिकतेतून हे सरकार काम करत आहे. कारण या नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील मराठी माणूसच नाही.

मागच्या काळात राज्यपाल यांनी भूमिका मांडली होती हे समाजात दुही निर्माण करण्याचा काम आहे. आता मुंबईत मराठी माणूस राहूच नये अशा केंद्र सरकारच्या धोरणाने राज्य सरकार काम करत असावे कारण मुंबई मराठी माणूस मंत्रिमंडळ नाही असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं. तर शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. मराठीचा मुद्दा घेऊन आमदारांनी बंड केलं. त्या मराठी अस्मितेचाच त्यांना विसर पडला काय? मराठी अस्मिता सांगणाऱ्या लोकांना मराठी आमदार मुंबईतून मिळाला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

शिवसेनेनं मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरच आतापर्यंत आपलं वर्चस्व राखलं आहे. मराठी माणूस, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या शिवसेनेचे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चार मंत्री होते. यामध्ये आदित्य ठाकरे, सुभाष देसाई , वर्षा गायकवाड, अनिल परब यांचा समावेश होता. मात्र आता शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मुंबईला एकच मंत्रिपद आहे. शिंदे गटात यामिनी जाधव, सदा सरवणकर हे दोन मराठी आमदार होते. याशिवाय भाजपचेही काही मराठी आमदार असताना मंगल प्रभात लोढा या अमराठी नेत्याची वर्णी लागली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी १६ जागांवर भाजप, १४ जागी शिवसेना तर पाच जागा काँग्रेस राष्ट्रवादीने आणि एक जागा समाजवादी पक्षाने जिंकली होती.

IPL_Entry_Point