मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपालांच्या हिंदी भाषणामुळं वादाची ठिणगी; महाविकास आघाडीचे संघर्षाचे संकेत

राज्यपालांच्या हिंदी भाषणामुळं वादाची ठिणगी; महाविकास आघाडीचे संघर्षाचे संकेत

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 27, 2023 07:10 PM IST

Jitendra Awhad on Ramesh Bais Hindi Speech : मराठी भाषा गौरव दिनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांनी हिंदी भाषणानं केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Jitendra Awhad - Ramesh Bais
Jitendra Awhad - Ramesh Bais

Jitendra Awhad on Ramesh Bais Hindi Speech : भगतसिंह कोश्यारी यांच्या गच्छंतीनंतर राजभवन विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबेल असं चिन्हं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाची ठिणगी पडली आहे. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठी भाषा गौरव दिनी विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर हिंदीतून केलेलं भाषण यासाठी कारणीभूत ठरलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांच्या भाषणाला तीव्र आक्षेप घेतला आहे. 'अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपलं पहिलं भाषण हिंदीत करतात, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी राज्यपालांच्या भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

विधानभवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. 'संस्कृतच्याही आधी मराठीचा जन्म झाला आहे, असं दुर्गा भागवत यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. दक्षिण प्रांतातील आठ भाषा अभिजात दर्जा घेऊन बसल्या आहेत आणि मराठी आजही दिल्लीच्या तख्तावर डोकं घासून आमच्या भाषेला अभिजात दर्जा द्या सांगत आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा यामागचा उद्देश आहे. केंद्रानं अद्याप त्यावर होकार कळवलेला नाही. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. विधानसभेत सर्वच सदस्य मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एकत्र आले होते. असं सगळं असताना राज्यपाल हिंदीत भाषण करतात, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

प्रत्येक राज्यपाल मराठीतच भाषण करतो ही परंपरा आहे. अगदी पी. सी, अलेक्झांडर हेही मराठीत भाषण करायचे. आपल्या राज्यपालांनीही मराठीत बोलायला हवं होतं. मात्र, यात त्यांच्यापेक्षा जास्त चूक ही मंत्रिमंडळाची आहे. 'राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते, याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे त्याच दिवशी असं होणं हे दुर्दैवी आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

IPL_Entry_Point