मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Refinery Project : रत्नागिरीत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध; बाचाबाची झाल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण!

Refinery Project : रत्नागिरीत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध; बाचाबाची झाल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 21, 2022 09:32 AM IST

Refinery Project In Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला आलेल्या अधिकाऱ्यांचा स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळं आता रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Refinery Project In Ratnagiri
Refinery Project In Ratnagiri (HT)

Refinery Project In Ratnagiri : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता आज पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं सर्वेक्षण न करू देण्याचा निर्धार स्थानिकांनी केला असून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा वाद उफाळला आहे.

बहुचर्चित नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर आता हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू गावासह इतर गावांमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यामुळं या रिफायनरी प्रकल्पासाठी परिसरातील ड्रोन सर्व्हेसह जमिनीचं आणि मातीचं परिक्षण करण्यासाठी काही अधिकारी काल राजापूर तालुक्यात आले होते, त्यावेळी त्यांना स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता, याशिवाय स्थानिक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. त्यानंतर आता आज पुन्हा या रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असून आता यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

विरोध असताना प्रकल्प लादला जाऊ नये, स्थानिकांची मागणी…

राजापूर तालुक्यात हा रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला आमचा विरोध असतानाही सर्वेक्षण का केलं जात आहे?, असा सवाल स्थानिकांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. त्यामुळं आता आजही या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं काम होणार असून त्यामुळं वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय आज पोलिसांच्या कडक सुरक्षेत या प्रकल्पाचं सर्वेक्षण केलं जाऊ शकतं, असंही बोललं जात आहे.

रिफायनरी प्रकल्पाला गती देण्याची उद्योगमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी...

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला गती देण्याची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याआधी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नाणारमध्ये हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित होता, परंतु त्याला शिवसेना आणि स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्याला रद्द करण्यात आलं होतं. परंतु आता हा प्रकल्प राजापूर तालुक्यात हलवण्यात आल्यानंतर राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार, याकडं सर्वाचं लक्ष असणार आहे.

IPL_Entry_Point