मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापुरात पंचगंगा घाटावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री येणार

कोल्हापुरात पंचगंगा घाटावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री येणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 11, 2023 05:03 PM IST

panchganga ghat maha aarti : कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर १९ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते महाआरती होणार असून त्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

कोल्हापुरात पंचगंगा घाटावर १९ फेब्रुवारीला महाआरती
कोल्हापुरात पंचगंगा घाटावर १९ फेब्रुवारीला महाआरती

Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते पंचगंगा नदी घाटावर भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीसाठी पंचगंगा घाटावर महापालिकाकडून डागडुजी सुरु करण्यात आली आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्री,  आमदार व खासदार महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहेत. 

पंचगंगा नदीवर होणाऱ्या महाआरतीसाठी महापालिकेने कंबर कसली असून आरोग्य विभागाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण पंचगंगेचा काठ स्वच्छ करण्यात आला असून काठावर, पाण्यात असलेली मंदिरे, ओबऱ्या स्वच्छ करण्यात येत आहेत. काठावरील काही फरशा निखळल्या असल्याने त्याची डागडुजी सुरू आहे. नदीकडे जाणारा रस्ता आणि पायऱ्यांचे  काँक्रिटीकरण केले जात आहे. घाटावरील जुने लोखंडी ग्रील काढून नवीन बसविले जात असून रंगरंगोटी केली जात आहे. नदीकिनाऱ्यावरील कचरा व देवदेवतांच्या प्रतिमा हटविण्यात आल्या आहेत. नदीकाठावरील विजेच्या खांबावरील बल्ब बसविण्यात येत आहेत. 

कणेरी मठावर २० फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिद्धगिरी मठाकडून पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान कोल्हापूर भाजपकडून अमित शहांच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. अमित शहा कोल्हापुरात न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते. शहा यांच्या पत्नी सोनल शाह सुमारे ४० वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. शाह १९ फेब्रुवारीला कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. 

IPL_Entry_Point