मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊत यांना तुरुंगातील ग्रंथालयाचा आधार; असा घालवतात दिवस!

Sanjay Raut: संजय राऊत यांना तुरुंगातील ग्रंथालयाचा आधार; असा घालवतात दिवस!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 13, 2022 11:36 AM IST

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातील दिवस नेमका कसा जातो याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

पत्राचाळ पुनर्विकासातील कथित गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही त्यांच्याविषयीची चर्चा थांबायला तयार नाही. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. राऊत हे तुरुंगात दिवसभर नेमकं काय करतात याबाबतची माहिती आता समोर आली आहे. 

सुरुवातीच्या ईडी कस्टडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊत हे पत्रकार आहेत. सातत्यानं लिखाण करण्याची त्यांना सवय आहे. शिवसेनेत त्यांच्याकडं अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळं ते प्रचंड बिझी असायचे. अटक झाल्यामुळं अचानक त्यांची सर्व कामं थांबली आहेत. त्यामुळं तुरुंगात ते काय करतात याबद्दल उत्सुकता आहे.

सूत्रांच्या हवाल्यानं 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव संजय राऊत यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आलं आहे. त्यांचा कैदी नंबर ८९५९ आहे. संजय राऊत हे वाचन आणि लिखाणात आपला जास्तीत जास्त वेळ घालवतात. तुरुंगातील ग्रंथालयाचा आधार त्यांनी घेतला आहे. ग्रंथालयातील पुस्तकं व वर्तमानपत्र ते नियमित वाचतात. त्याशिवाय, टीव्ही रोजच्या बातम्या पाहण्यात त्यांचा वेळ जातो. त्यांच्या मागणीनुसार तुरुंगात त्यांना वही आणि पेन पुरवण्यात आलं आहे. मात्र, तुरुंगात असताना केलेलं लिखाण त्यांना तूर्त प्रसिद्ध करता येणार नाही. ते त्यांच्यापुरतंच राहणार आहे.

संजय राऊत यांना हृदयाचा त्रास आहे. त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी ॲंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळं न्यायालयाच्या सुचनेनुसार त्यांना घरचं जेवण दिलं जात आहेत. आवश्यक ती औषधंही दिली जातात. राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

IPL_Entry_Point