मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपाल रुग्णालयात, राजकीय उलथापालथ सुरू असताना चार्ज कुणाकडे?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

राज्यपाल रुग्णालयात, राजकीय उलथापालथ सुरू असताना चार्ज कुणाकडे?

22 June 2022, 12:48 ISTSuraj Sadashiv Yadav

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या ट्विटमधून अनेक संकेत मिळत आहेत. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे. राज्यात आता इतक्या घडामोडी घडत असताना राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र राज्यपालच राजभवनावर नसल्यामं काम कसे होणार असे प्रश्न निर्माण झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्राच्या राज्यपालांचा चार्ज गोव्याच्या राज्यपालांकडे सोपवण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र महाराष्ट्राच्या राज्यपाल भवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देताना असे काही नसल्याचं सांगण्यात आलंय. राज्यपालांचा चार्ज दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या राज्यपालांकडे दिला जाणार नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा चार्ज त्यांच्याकडेच राहणार आहे. रुग्णालयातून राज्यपाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपलब्ध असतील अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुरतमध्ये ४० आमदारांसह मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांनी आसामला गुवाहाटीला आपला मुक्काम हलवला आहे. तिथून सध्या एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पुढची प्रक्रिया करणार असल्याचं त्यांनी सांगितले होते. आता राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यानं पुढची प्रकिया कशी होईल याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, राज्यात पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण झाली असल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांची भेट ते घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे बैठक होण्याऐवजी त्यांनी फोनवरून संवाद साधला. यानंतर आता कमलनाथ हे शरद पवार यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.