मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Go Green : तब्बल ८९ हजार पुणेकरांकडून वीज बिलांच्या छापील कागदाचा वापर बंद; महावितरणच्या 'गो-ग्रीन'ला प्रतिसाद

Go Green : तब्बल ८९ हजार पुणेकरांकडून वीज बिलांच्या छापील कागदाचा वापर बंद; महावितरणच्या 'गो-ग्रीन'ला प्रतिसाद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 24, 2022 05:39 PM IST

Mahavitarn Go Green : महावितरणच्या गो ग्रीन मोहिमेला तब्बल ८९ हजार पुणेकरांनी प्रतिसाद दिला असून त्यांनी बिलासाठी कागदाचा वापर टाळला आहे.

महावितरण गो ग्रीन
महावितरण गो ग्रीन

पुणे : पर्यावरण सवर्धनाच्या दृष्टिकोनातून पुणे परिमंडलातील ८८ हजार ९२५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. त्यांनी बिल भरण्यासाठी  'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या मोहिमेत तब्बल १४ हजार १४० ग्राहकांनी सहभाग घेतला आहे.

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते 'गो-ग्रीन' योजनेतील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. 'एसएमएस'द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे तात्काळ भरण्याची सोय उपलब्ध आहे.

'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील ४७ हजार ५७४ तर पिंपरी चिंचवड शहरातील २६ हजार ११७ तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यामध्ये १५ हजार २३४ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपुरक योजनेत सहभाग घेतला आहे. महावितरणची 'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग