मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard Attack : आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू; जंगलातून मृतदेह ताब्यात

Leopard Attack : आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू; जंगलातून मृतदेह ताब्यात

Oct 24, 2022 02:40 PM IST

Leopard Attack In Aarey Colony : दिवाळीला दिवे लावण्यासाठी चिमुकली बाहेर गेली होती. त्यावेळी बिबट्यानं चिमुकलीवर हल्ला करत तिला जंगलात फरफटत नेलं.

Leopard Attack In Aarey Colony
Leopard Attack In Aarey Colony (HT)

Leopard Attack In Aarey Colony : संपूर्ण देशभरासह राज्यात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण दिवाळीला घराबाहेर दिवे लावायला गेलेल्या दीड वर्षाच्या एका चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आता ऐन दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील आरे कॉलनीत शोककळा पसरली आहे. इतिका लोट असं मृत चिमुकलीचं नाव असून आता बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीतील युनिट नंबर १५ मध्ये दीड वर्षांची चिमुकली आपल्या आईसह सकाळी साडेसहाच्या सुमारास दिवे लावण्यासाठी घराबाहेर गेली होती. दिवे लावून घराच्या दिशेनं परतत असताना चिमुरडीवर अचानक मागून आलेल्या बिबट्यानं हल्ला केला. आई मुलीच्या पुढे चालत असल्यानं तिला ही बाब लक्षात आली नाही. परंतु इतिका घरात न आल्यानं घाबरलेल्या तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिचा मृतदेह आरेतील जंगलात आढळून आला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तातडीनं तिला रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. या घटनेची माहिती मिळताच मुंबईतील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील आरे कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचा अधिवास असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं अनेक पर्यावरणवादी आरेतील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला विरोध करत असतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आरे कॉलनीत झपाट्यानं नागरिकरण झाल्यानं जंगलातील बिबट्यांनी मानवी वस्तीत येण्यास सुरुवात केली आहे. याआधीही आरे कॉलनीत बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. परंतु आता ऐन दिवाळीच्या दिवशी एका दीड वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर