मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Employees Strike : राज्यातील १९ लाख कर्मचारी उद्यापासून संपावर; सरकारची कोंडी

Employees Strike : राज्यातील १९ लाख कर्मचारी उद्यापासून संपावर; सरकारची कोंडी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 13, 2023 08:12 PM IST

Maharashtra govt employees strike for Old Pension : अखिल भारतीय किसान सभेनं शेतकऱ्यांच्या लाँग मार्चची घोषणा केलेली असतानाच आता राज्यातील कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

employees strike for old pension scheme in maharashtra
employees strike for old pension scheme in maharashtra (HT)

employees strike for old pension scheme in maharashtra : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेनं नाशिक ते मुंबई अशा लाँग मार्चची घोषणा केलेली असतानाच आता राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता आधीच शेतकऱ्यांच्या मार्चमुळं संकटात सापडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला कर्मचाऱ्यांच्या संकटामुळं मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांच्या प्रमुखांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु त्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळं कर्मचारी संघटनांनी उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळं राज्यातील तब्बल १९ लाख कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळं त्याचा सामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

जुन्या पेन्शन योजनेबाबतत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारनं एका समितीची घोषणा केली आहे. परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय न घेण्यात आल्यामुळं कर्मचारी संघटनांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. यावेळी बैठकीत राज्य सरकारच्या वतीनं संप मागे घेण्याच आवाहन करण्यात आलं. परंतु त्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. मध्यरात्री बारापासून अर्थातच उद्यापासून कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळं राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये राज्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी आणि सरकारच्या विविध विभागातील कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळं पुढील काही दिवस राज्यातील यंत्रणा विस्कळीत होणार असून आंदोलन किती काळापर्यंत चालणार हे निश्चित नसल्यामुळं सामान्यांच्या चिंता वाढल्या आहेत. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं संप सुरू झाल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point