Delhi MLA Salary Hike News : कर्मचारी, शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच आणि भारतासह संपूर्ण देशभरात आर्थिक मंदीचं सावट असतानाच आता दिल्लीतील आमदारांच्या पगारात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या ६६ टक्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव विधानसभेत पास करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आमदारांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. दिल्लीतील आमदारांना यापूर्वी ५४ हजार रुपये इतका मूळ पगार होता. वेतनवाढीच्या निर्णयानंतर आमदारांना ९० हजार रुपये इतका पगार मिळणार आहे. त्यात सर्व प्रकारच्या भत्त्यांचा समावेश केला तर महिन्याकाठी आमदारांच्या हाती १ लाख ७० हजार रुपये येणार आहे. त्यामुळं आता आर्थिक संकटाच्या काळात जनता उपाशी आणि आमदार तुपाशी असा निर्णय घेण्यात आल्यामुळं यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील आमदारांच्या पगारवाढीच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्याची माहिती दिल्लीच्या न्याय विभागानं दिली आहे. आमदारांचा पगार, भत्ता आणि निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी दिल्लीच्या विधानसभेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक प्रस्ताव पास करण्यात आला होता. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या पगारवाढीचा मुद्दाही त्यात नमूद करण्यात आला होता. या प्रस्तावाला १४ फेब्रुवारीला राष्ट्रपती मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता मार्च महिन्याच्या अखेरीस आमदारांना नवीन नियमांनुसार वेतन मिळणार आहे. यापूर्वी दिवंगत मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या सत्ताकाळात आमदारांचा पगार वाढवण्यात आला होता. त्यानंतर आता केजरीवाल यांनी पुन्हा आमदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमानुसार, आमदारांच्या मूळ पगारात ३६ हजारांची वाढ होणार आहे. याशिवाय ४५ हजार रुपयांचा मासिक भत्ता मिळेल. इतकंच नाही तर प्रवास भत्ता, टेलिफोन बिल आणि अधिवेशन काळातील मानधनही वाढवण्यात आलं आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील आमदारांचा पगार वाढवण्यात आला होता. त्यानंतर आता दिल्लीतील आमदारांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आल्यामुळं आता इतर राज्यांमधील आमदारांच्या पगारातही वाढ केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.