मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आम्हीच खरी शिवसेना, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचे थेट उत्तर

आम्हीच खरी शिवसेना, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचे थेट उत्तर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 24, 2022 07:36 AM IST

शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे पत्र पाठवले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे
मंत्री एकनाथ शिंदे (फोटो - एएनआय)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या १२ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असं पत्र शिवसेनेने (Shivsena) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवलं. शिवसेनेच्या या पत्रानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून थेट उत्तर दिलं आहे. तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत."

एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलं की,"12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे."

शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, बालाजी किनीकर, अनिल बाबर, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे,अब्दुल सत्तार, यामिनी जाधव, भुमरे, संजय शिरसाट, लता सोनावणे या १२ आमदारांच्या नावांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या