मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज दिल्लीत; कमल हासन राहुल गांधींसोबत करणार पदयात्रा

Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज दिल्लीत; कमल हासन राहुल गांधींसोबत करणार पदयात्रा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 24, 2022 09:31 AM IST

Bharat Jodo Yatra In Delhi : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत दाखल होणार आहे.

Bharat Jodo Yatra In Delhi Today Live Updates
Bharat Jodo Yatra In Delhi Today Live Updates (HT)

Bharat Jodo Yatra In Delhi Today Live Updates : अनेक राज्यांचा प्रवास करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा आज देशाची राजधानी दिल्लीत दाखल होणार आहे. शहरातील पदयात्रेवेळी दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हजारो समर्थकांसह आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह राहुल गांधींची पदयात्रा दिल्लीत प्रवेश करत उत्तर प्रदेश आणि त्यानंतर पंजाबच्या दिशेनं रवाना होणार आहे. पदयात्रेवेळी राहुल गांधी हे राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणार होते. परंतु त्यांना अद्याप परवानगी मिळालेली नसल्यानं यात्रा लाल किल्ला परिसरात थांबणार आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या मुद्द्यावरून भाजपनं भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी केल्यानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राजस्थान आणि हरयाणामार्गे भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. काल द्रमुकच्या नेत्या खासदार कणीमोळी या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता दिल्लीत दाक्षिणात्य अभिनेते कलम हासन हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता कमल हासन हे देखील यात्रेत सहभागी होणार असल्यानं त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

कोरोना नियमांवरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप...

कोरोना नियमावलींचं पालन होत नसल्याचा आरोप करत भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केली. त्यानंतर राहुल गांधी जिथून जातात तिथं भाजपचा विजय होतो, त्यामुळं भारत जोडो यात्रा सुरू रहायला हवी, असं म्हणत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला उपरोधिक टोला लगावला आहे. त्यानंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कुणीही रोखू शकणार नाही, असं म्हणत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

IPL_Entry_Point