मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Police Bharti Scam : मुंबईतील पोलीस भरतीत मोठा घोटाळा; फेरपरीक्षा घेण्याची काँग्रेसची मागणी
Police Bharti
Police Bharti

Police Bharti Scam : मुंबईतील पोलीस भरतीत मोठा घोटाळा; फेरपरीक्षा घेण्याची काँग्रेसची मागणी

25 May 2023, 19:01 ISTGanesh Pandurang Kadam

Police Bharti Scam : मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत फेरपरीक्षा घेण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.

Police Bharti Scam : मुंबईत ७ मे २०२३ रोजी झालेल्या पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून कमी गुण मिळालेल्यांना पात्र ठरवण्यासाठी लाखो रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्यामुळं ही भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून पारदर्शक पद्धतीनं फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील विविध भागातून आलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईतील टिळक भवन कार्यालयात भेट घेतली व पोलीस भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली. यानंतर पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सर्व प्रकार त्यांना सांगितला व कारवाई करण्याची मागणी केली.

किती आनंदी आनंद… मुंबईतील झोपडीधारकांना मिळणार अवघ्या अडीच लाखांत घर

पटोले यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे. 'पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी ही परीक्षा एक मोठी संधी होती. परंतु यात अनुचित प्रकार झाल्याचं उघड झालं आहे. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आलं. भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेऊन शारीरिक चाचणीचे गुण वाढवण्यात आले, शारीरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलं. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असं पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.

'पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या ज्या तक्रारी येत आहेत, त्या गंभीर आहेत. या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी व त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करावी. मुला मुलींच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे. त्यामुळं मुंबईत पार पडलेली ही भरती प्रक्रिया स्थगित करून ती पुन्हा पारदर्शक पद्धतीनं घ्यावी, अशी आग्रही मागणी पटोले यांनी केली आहे.