मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dongri to IAS : चार वेळा अपयश येऊनही थांबला नाही! गोदी कामगाराच्या जिद्दी मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

Dongri to IAS : चार वेळा अपयश येऊनही थांबला नाही! गोदी कामगाराच्या जिद्दी मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 25, 2023 04:56 PM IST

Mohammed Husain cleared UPSC CSE : मुंबईतील गोदी कामगाराच्या मुलानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे.

Mohammed Husain cleared UPSC CSE
Mohammed Husain cleared UPSC CSE

Mohammed Husain cleared UPSC CSE : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कष्टानं या परीक्षांमध्ये बाजी मारली. त्यातील प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रेरणादायी आहे. मुंबईतील मोहम्मद हुसेन हाही त्यांच्यापैकीच एक.

मोहम्मद हुसेननं देखील यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. संपूर्ण भारतात त्यानं ५७० वा क्रमांक पटकावला आहे. मोहम्मद हुसेन हा मुंबईतील एका गोदी कामगाराचा मुलगा. वाडीबंदर झोपडपट्टीत एकत्र कुटुंबात तो आजी, आई-वडील, मोठे भाऊ व त्यांच्या मुलांसह राहतो. वडिलांसोबत वेगवेगळ्या कामानिमित्त सरकारी कार्यालयात खेटे घालत असतानाच आपण नागरी सेवेत जायचे असा निर्धार मोहम्मद हुसेननं केला होता. अर्थात, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

मुंबईतील वाडीबंदर परिसरातील सोलापूर स्ट्रीटवरील धूळभरल्या गल्ल्यातील वातावरणात अभ्यासासाठी एकांत शोधणं हे मोहम्मदसाठी पहिलं आव्हान होतं. तो ज्या खोलीत अभ्यास करायचा, तिथं छताला डोकं आपटल्याशिवाय उभंही राहता येत नव्हतं. अनेकदा तो आपली पुस्तके घरासमोरील सावलीत किंवा आसपासच्या एखाद्या गोदामात घेऊन जात असे. काही काळ तो जवळच्या जाफर सुलेमान मुसाफिरखाना या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही राहिला.

Thane's UPSC Topper: यूपीएससीत टॉपर ठरलेल्या ठाण्याच्या लेकीची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

अपुरी जागा, अभ्यासासाठी पोषक वातावरणाचा अभाव, स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव आणि साधनसुविधांची कमतरता या सगळ्यांवर मात करत त्यानं हे यश मिळवलं. कुटुंबात सर्वात लहान असलेल्या आपल्या मुलाच्या या यशामुळं संपूर्ण घर आनंदात न्हाऊन निघालं आहे.

मूळचे तेलंगणमधील हैदराबादचं असलेलं हुसेन कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासकीय सेवेत अत्यंत कमी संख्येत असलेल्या मुस्लिम समाजातील एका तरुणासाठी ही परीक्षा पास करणं हे अधिकच मोठं आव्हान होतं. पण वडिलांच्या व कुटुंबाच्या पाठिंब्यावर त्यानं ते पेलून दाखवलं.

समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न कर, अशा शब्दांत वडील मला प्रोत्साहित करायचे, असं मोहम्मद हुसेन म्हणाला. माझ्या संपूर्ण कुटुंबानं मला साथ दिली. घरच्या अडचणीमुळं अभ्यासावरून माझं लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घेतली. वडिलांनी अगदी परीक्षेसाठी वर्गात जाईपर्यंत माझी सोबत केली, असं त्यानं एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं.

मोहम्मद हुसेनचे आजोबा सरकारी सेवेत होते. मात्र, वडिलांचं शिक्षण न झाल्यामुळं त्यांना व्हाईट कॉलरची नोकरी मिळाली नाही. डॉकयार्डमध्ये ट्रकमधून माल भरण्याचे आणि उतरवण्याचे काम त्यांनी केलं आणि पुढं ते सुपरवायजर झाले.

UPSC Topper : यूपीएससी टॉपर इशिताकडून जाणून घ्या नागरी सेवेत यश मिळवण्याचा मंत्रा!

आपलं शिक्षण झालं नसलं तरी मुलाला नामांकित संस्थेत शिक्षण मिळेल याची काळजी रमझान हुसेन यांनी घेतली. डोंगरी येथील सेंट जोसेफ शाळेत त्यांनी मोहम्मदला घातलं. २०१८ मध्ये मोहम्मदनं फोर्ट येथील एल्फिन्स्टन कॉलेजमधून बॅचलर पदवी मिळवली. केंद्र सरकारतर्फे मुंबईतील हज हाउस इथं चालवली जाणारी विशेष प्रशिक्षण संस्था, पुण्यातील युनिक अकादमी आणि दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या अकादमीत मोहम्मदनं यूपीएससीची तयारी केली. सरकारी आणि खासगी संस्थांकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीचीही त्याला मदत झाली.

मोहम्मद हुसेन या आधीच्या चार प्रयत्नांमध्ये केवळ प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला होता. मुख्य परीक्षेत तो नेहमी अडखळायचा. चौथ्या वेळी अपयश आल्यानं तो कोलमडला होता. त्यानंतर एका मशिदीत बसून त्यानं बराच विचार केला आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्धार करूनच तो बाहेर पडला. कठीण काळात साथ देणाऱ्या मित्रांचेही तो यासाठी आभार मानतो.

उत्साहपूर्ण सातत्य महत्त्वाचं

भारतीय पोलीस सेवा (IPS) किंवा भारतीय महसूल सेवे (IRS) मध्ये जाण्याची त्याची इच्छा आहे. देशाच्या विकासात मला सकारात्मक योगदान द्यायचं आहे, असं तो म्हणतो. 'कष्टाचं फळ लगेच मिळतं असं नाही, परंतु सातत्य राखून उत्साहानं काम करणं महत्त्वाचं आहे, असा सल्ला त्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

WhatsApp channel

विभाग