मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivrajyabhishek Din : प्रतापगड विकास प्राधिकरण स्थापण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, उदयनराजेंवर सोपवली मोठी जबाबदारी

Shivrajyabhishek Din : प्रतापगड विकास प्राधिकरण स्थापण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, उदयनराजेंवर सोपवली मोठी जबाबदारी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 02, 2023 02:18 PM IST

Eknath Shinde at Raigad : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा केली.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde at Raigad : रायगड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगडच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किल्ले रायगडावरून केली. खासदार उदयनराजे भोसले हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार किल्ले रायगडावर पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मंत्री व हजारो शिवभक्त यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी शिवरायांच्या कार्याची महती सांगताना काही घोषणा केल्या.

मुख्यमंत्री म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवरायांच्या पराक्रमामुळंच संपूर्ण देशाला सुखाचे, स्वातंत्र्याचे क्षण अनुभवता आले. आपल्या माताभगिनींचं जगणं सुसह्य झालं. आजचा सोहळा हा शिवरायांच्या कार्याची पूजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एकही संधी आपण सोडता कामा नये असं मला वाटतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

'शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. शिवाजी महाराजांसाठी गडकिल्ले हे जीव की प्राण होते. या किल्ल्यांचं जतन करण्याचं काम आपलं सरकार करत आहे. म्हणूनच रायगडच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज आम्ही जाहीर करत आहोत, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. शिवसृष्टीच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

IPL_Entry_Point

विभाग