MP Krupal Tumane On Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीसमोर शिवसैनिकांना संबोधित करत शिंदे गटावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी ठाकरे गटातील आणखी १० आमदार फुटणार असल्याचा दावा करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे नवे पक्षप्रमुख आहेत. आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही पुढे नेण्याचं काम करणार आहोत. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आम्हाला मिळाल्यानंतर आता आमच्या चिन्हावर निवडून आलेले ठाकरे गटातील आणखी १० आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा दावाही कृपाल तुमाने यांनी केला आहे. निवडणूक आयोगानं दिलेला निकाल आम्हाला अपेक्षितच होता, सुप्रीम कोर्टातील निकालही शिंदे गटाच्या बाजूनंच लागणार आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलं होतं, ते आज आम्ही परत आणल्याचंही खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे.
दसऱ्याच्या वेळीच ठाकरे गटातील दोन खासदार आमच्यासोबत येणार होते. परंतु त्यावेळी शिंदे गटात न आलेले दोन खासदार आणि १० आमदार हे लवकरच आमच्यासोबत येणार आहेत. कारण त्यांनी आमच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असल्यानं ते आमचेच असल्याचा दावाही तुमाने यांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या