मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; १५ जणांवर गुन्हा

Pune Crime : लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; १५ जणांवर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 07:42 AM IST

Pune Crime : लोणीकंद पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Crime

पुणे : पुण्यात लहान मुलांच्या भांडणातून थेट दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात घडली.

याबाबत सचिन प्रभाकर आव्हाळे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य दादासाहेब आव्हाळे, महेश संभाजी कुटे, कौशल कैलास आव्हाळे, सिद्धांत प्रवीण आव्हाळे, कैलास किसन आव्हाळे, दादासाहेब गोविंद आव्हाळे, मंदाकिनी दादासाहेब आव्हाळे, आदिती दादासाहेब आव्हाळे, सुवर्णा प्रवीण आव्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी सचिन आव्हाळे यांचा ११ वर्षांचा मुलगा आणि प्रदीप आव्हाळे यांचा १० वर्षांचा मुलगा यांच्यात खेळताना वाद झाला. दरम्यान, या वादातून आरोपींनी सचिन यांच्या मोटारीवर दगड फेकून मारले. तसेच दांडके आणि कोयत्याने सचिन यांना मारहाण करत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सचिन यांची आई शारदा आणि वडिलांना कोयत्याने आणि गजाने मारहाण केल्याचे सचिन यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, प्रवीण विठ्ठल आव्हाळे (वय ४०, रा. कॅनेरा बँकेजवळ, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी देखील परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन पिराजी आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे, पल्लवी सचिन आव्हाळे, नामदेव पिराजी आव्हाळे यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण यांचा मुलगा वेदांत आणि आरोपी सचिन यांचा मुलगा स्वराज यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी सचिन आणि कुटुंबीयांनी प्रवीण यांचे वडील विठ्ठल, वहिनी, भाऊ दादासाहेब, पुतण्या आदित्य आणि वेदांत यांना गजाने मारहाण केल्याचे प्रवीण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग