मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Guwahati : मुख्यमंत्री शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; या कारणामुळं दौऱ्याची होतेय चर्चा

Guwahati : मुख्यमंत्री शिंदे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार; या कारणामुळं दौऱ्याची होतेय चर्चा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 06, 2022 02:31 PM IST

Eknath Shinde Guwahati Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळं आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

CM Eknath Shinde Guwahati Visit
CM Eknath Shinde Guwahati Visit (HT)

CM Eknath Shinde Guwahati Visit : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतल्या ४० आमदारांसह बंड करत राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तीन महिन्यांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार पुढच्या आठवड्यात गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. कारण याबाबत गुवाहाटीतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शिंदे गटाचे काही नेते गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहे. या दौऱ्यात ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार असून ज्या लोकांनी अथवा नेत्यांनी शिंदे गटाला बंडावेळी गुवाहाटीत मदत केली होती, त्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानतील, अशी माहिती आहे. त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा, आसामचे राज्यपाल, गुवाहाटीचे पोलीस अधिक्षक आणि इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री शिंदे भेट घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील सर्व आमदार उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता शिंदे गटाचे आमदार आधी गुवाहाटीला जाणार की अयोध्येला याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point