मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Onion Subsidy: कांदा उत्पादकांना ३०० ऐवजी ५०० रुपये अनुदान द्या; छगन भुजबळ यांचे ‘वॉक आउट’
CM Eknath Shinde announced procurement subsidy of RS 300 per quintal for onion
CM Eknath Shinde announced procurement subsidy of RS 300 per quintal for onion

Onion Subsidy: कांदा उत्पादकांना ३०० ऐवजी ५०० रुपये अनुदान द्या; छगन भुजबळ यांचे ‘वॉक आउट’

13 March 2023, 17:20 ISTHaaris Rahim Shaikh

Chhagan Bhujbal demands ₹500 subsidy for onion : शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी १२०० रुपये खर्च येतो. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ३०० रुपयांची मदत तुटपुंजी आहे.

राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कांदावर प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु एकूण उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची विरोधकांनी मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडत सरकारचा निषेध करत विधानसभेतून वॉक आऊट केले.

ट्रेंडिंग न्यूज

भुजबळ म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी १२०० रुपये खर्च येतो. मात्र कांद्याला आज ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७०० रुपये भाव मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ ३०० रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी भुजबळ यांनी केली. तसेच या बाबीकडे लक्ष वेधत सभागृहातून वॉक आउट करत सरकारचा निषेध नोंदविला.

कृषीमंत्र्यांची संवेदनाहीन टिप्पणी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भुजबळ यांनी आज विधानसभेत नियम ५७ अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी ते म्हणाले, की शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यावर राज्याच्या कृषीमंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिप्पणी केली आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा आपण तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचं भुजबळ म्हणाले.

अवकाळी पावसामुळे ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात असल्याचं सांगत, या वक्तव्याचा निषेध करत भुजबळ यांनी सभागृहातून वॉक आउट केले.