मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BS Koshyari : भगतसिंह कोश्यारींना पदमुक्त करण्यासाठी याचिका दाखल; उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

BS Koshyari : भगतसिंह कोश्यारींना पदमुक्त करण्यासाठी याचिका दाखल; उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 30, 2022 09:04 AM IST

Bhagat Singh Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj
Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj (HT)

Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळं कोश्यारींना पदमुक्त करण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना करून राज्यपालपदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर आता कोर्टानं याचिकेवर उद्या सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळं आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जगदेव यांनी अॅड नितीन सातपुते यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमोर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील शांती आणि सलोखा बिघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत महाभियोगाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांना राज्यपालपदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दीक्षांत समारोह सोहळ्यात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली होती. त्यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करत भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याशिवाय छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली होती. त्यामुळं आता या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय उद्या काय निकाल देणार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point