मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anand Dave : बजेटमध्ये ब्राह्मणांसाठी काहीच नाही, भाजपला निवडणुकीत धडा शिकवू; हिंदू महासंघांचा इशारा

Anand Dave : बजेटमध्ये ब्राह्मणांसाठी काहीच नाही, भाजपला निवडणुकीत धडा शिकवू; हिंदू महासंघांचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2023 08:16 PM IST

Maharashtra Budget : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवाचा राग भाजपनं ब्राह्मण समाजावर काढला का?, असा सवाल हिंदू महासंघाकडून करण्यात आला आहे.

Anand Dave On Maharashtra Budget
Anand Dave On Maharashtra Budget (HT)

Anand Dave On Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केला आहे. त्यात शेतकरी आणि महिलांसह अनेक समाजघटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजासाठी काहीच मिळालं नसल्याचा आरोप करत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कसब्याचा राग भाजपनं ब्राह्मण समाजावर काढला, जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप दवे यांनी भाजपवर केला आहे.

माध्यमांशी बोलताना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारच्या अमृत योजना सर्व जातींमधील लोकांसाठी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजासाठी वेगळं असं काहीही देण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता पुण्यातील कसब्यानं जशी दखल घेतली तशीच राज्यातील ४० मतदारसंघात घेतली जाईल, असं म्हणत आनंद दवे यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे. अर्थसंकल्पात प्रत्येक समाजासाठी काही ना काही देण्यात आलेलं आहे. ब्राह्मण समाजासाठी परशूराम विकास महामंडळाची मागणी करण्यात आलेली होती. त्यावर सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. अमृत योजना दिली परंतु ती योजना खुल्या प्रवर्गातील सर्वांनाच लागू होणार आहे. त्यावर सगळेच दावा ठोकणार आहेत. त्यामुळं ब्राह्मण समाजाला भाजपनं गृहित धरल्यास त्याचा फटका आगामी निवडणुकीत त्यांना बसेल, असंही हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पुण्यातील भिडे वाड्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी, काशीबा गुरव विकास महामंडळासाठी ५० कोटी, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळासाठी ५० कोटी, वडार समाजाच्या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु त्यात ब्राह्मण समाजासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्यामुळं हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point