मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidhan Parishad: पाचव्याच्या विजयाची खात्री नसताना भाजप सहावा उमेदवार उतरवणार?

Vidhan Parishad: पाचव्याच्या विजयाची खात्री नसताना भाजप सहावा उमेदवार उतरवणार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 09, 2022 12:42 PM IST

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं सहावा उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Harshvardhan Patil
Harshvardhan Patil

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होऊ घातलेली निवडणूक राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ घडवणारी ठरणार असल्याची चिन्हं आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळंच की काय चार उमेदवार निवडून आणण्याची ताकद असतानाही भाजपनं सहा उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याची निवड केली आहे.

राज्य विधान परिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होत आहे. संख्याबळानुसार, या निवडणुकीत भाजपचे चार, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या मतांची गरज लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसला ही मतं सहज मिळू शकतात. मात्र, महाविकास आघाडीची एक जागा खेचून आणायची या उद्देशानं भाजपनं पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आता सहावा उमेदवार रिंगणात उतरवण्याचीही तयारी भाजपनं सुरू केली आहे.

भाजपनं नुकतीच विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यात पाचवा उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांचं नाव आहे. त्यांना विजयासाठी अपक्ष व छोट्या पक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळं त्यांचा विजय अधांतरी आहे. असं असतानाही भाजपनं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. हर्षवर्धन पाटील हे बरीच वर्षे मंत्री राहिले आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत. ते आघाडीची काही मतं सहज वळवू शकतात. तसं झाल्यास भाजपचा सहावा उमेदवार निवडून आला नाही तरी महाविकास आघाडीचा एक उमेदवार नक्कीच पडू शकतो. हा डाव यशस्वी झाल्यास महाविकास आघाडीला तो मोठा राजकीय धक्का असणार आहे. त्यातून आघाडीतील तीन पक्षांमध्ये बेबनाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळंच भाजप ही खेळी करण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या या खेळीवर कोणता तोड काढतात, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या