मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shrirampur Bandh : जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपुरात बंद, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Shrirampur Bandh : जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपुरात बंद, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 17, 2023 07:36 AM IST

Shrirampur Bandh Today : नव्या जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अनेक संघटनांनी आज श्रीरामपुरात बंद पुकारला आहे.

Shrirampur Bandh News Today
Shrirampur Bandh News Today (HT)

Shrirampur Bandh News Today : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने शिर्डीत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलं आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता आणि शिर्डी या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु आता शिर्डीतील शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा विरोध करत श्रीरामपूर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी आज अनेक संघटनांनी शहरात बंद पुकारला आहे. श्रीरामपूर जिल्हा जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी श्रीरामपूर शहर बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. याला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पाच जिल्ह्यांच्या विभाजनासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यात अहमदनगरचाही समावेश होता. अहमदनगरमध्ये सध्या संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आणि श्रीरामपूर यापैकी एका शहराच्या जिल्हा निर्मितीचे प्रयत्न शासकीय स्तरावर सुरू आहे. परंतु या सर्व तालुक्यांमधील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हानिर्मितीची मागणी केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्हा प्रशासनाने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर आता श्रीरामपुरमधील अनेक संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी आज श्रीरामपुरात बंद पुकारला आहे. त्यानंतर आता शहरातील अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिर्डी हे धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या राज्यातील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. भारतासह विदेशातूनही अनेक पर्यटक तसेच भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळंच जिल्हा प्रशासनाने शिर्डीत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलं आहे. परंतु आता त्याला श्रीरामपुरातून मोठा विरोध होताना दिसत आहे. कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष देखील श्रीरामपुरच्या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं आता यावर शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point