मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Ayodhya : अयोध्येला निघालेली रेल्वे थांबवली, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Shivsena Ayodhya : अयोध्येला निघालेली रेल्वे थांबवली, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 07, 2023 09:21 PM IST

Shivsena Ayodhya Visit : शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर अयोध्येला जाणारी रेल्वे थांबवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Shivsena Leaders Ayodhya Visit
Shivsena Leaders Ayodhya Visit (HT)

Shivsena Leaders Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारपासून दोनदिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते अयोध्येत राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री शिंदे भेट घेणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहे. आज दुपारी नाशिक आणि ठाण्यातून दोन विशेष रेल्वेगाड्या अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहे. परंतु आता अयोध्येला निघालेल्या रेल्वेत शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाशिकमधून घेऊन निघालेल्या रेल्वेत शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बोगीत बसण्यावरून मोठा वाद झाला आहे. त्यामुळं मनमाड जँक्शनवर रेल्वे ३० मिनिटं थांबवण्यात आली. वाद निवळल्यानंतर रेल्वे पुन्हा निघाली. परंतु नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद झाल्यामुळं चैन खेचून दोनदा ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर देखील चालत्या ट्रेनमध्ये शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्यामुळं शिंदे गट अडचणीत सापडण्याची चिन्हं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे रेल्वे स्टेशनवर अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी शिंदे गटासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा जयजयकार करत अयोध्येच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. ठाण्यासह नाशिकमधूनही एक रेल्वे अयोध्येसाठी निघाली आहे. त्यामुळं आता शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

IPL_Entry_Point