मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'फडणवीस भाजपचे भविष्य', मोदींचा उल्लेख करत ब्राह्मण महासंघाचे जेपी नड्डांना पत्र

'फडणवीस भाजपचे भविष्य', मोदींचा उल्लेख करत ब्राह्मण महासंघाचे जेपी नड्डांना पत्र

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 19, 2022 02:13 PM IST

Brahmin mahasangha letter to JP Nadda राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री केल्यानं धक्का बसल्याचंही या पत्रात म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता भाजपने घेतलेल्या निर्णयाने दिलासा मिळाला असल्याचं ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटलं आहे.

ब्राह्मण महासंघाचे जेपी नड्डांना पत्र
ब्राह्मण महासंघाचे जेपी नड्डांना पत्र (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Brahmin mahasangha letter to JP Nadda: भाजपने नुकतेच संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये बदल केले. यातून नितीन गडकरींना वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागली आहे. यामुळे फडणवीस यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाल्याची चर्चा सुरू आहे. तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. फडणवीसांना आता लोकसभेला पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय राजकारणातसुद्धा विजयाची घोडदौड फडणवीस कायम ठेवतील असा विश्वास ब्राह्मण महासंघाने पत्रातून व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या नावाची घोषणा करून भाजप त्यांचा सन्मान करेल अशी आशा या पत्रात व्यक्त करण्यात आलीय. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी हे पत्र जेपी नड्डा यांना लिहिलं आहे.

पत्रात म्हटलं आहे की,"संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना स्थान दिल्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस हे कुशल राजकारणी आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल."

राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री केल्यानं धक्का बसल्याचंही या पत्रात म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता भाजपने घेतलेल्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं असंही पत्रात म्हटलंय.

पुणे लोकसभा मतदारसंघात फडणवीसांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करताना त्यांनी म्हटलं की, पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. पुढे २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेतच. त्यामुळे आता फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करेल."

ब्राह्मण महासंघ कोणत्याच पक्षाचं समर्थन करत नाही, मात्र तरीसुद्धा राष्ट्रहितासाठी आमचा हा आग्रह असल्याचं पत्रात म्हटलं आहे. तसंच अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो असंही म्हटले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या