मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांचा दगडुशेठ गणपतीला बाहेरून नमस्कार, अजित पवार म्हणतात, मंदिरात गेले…

शरद पवारांचा दगडुशेठ गणपतीला बाहेरून नमस्कार, अजित पवार म्हणतात, मंदिरात गेले…

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 28, 2022 10:44 AM IST

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतल्यानं आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात दगडुशेठ हलवाई मंदिरात बाहेरूनच दर्शन घेतल्याची चर्चा सध्या राज्यात होत आहे. शरद पवार हे नास्तिक असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतल्यानं त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, "प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार आहे. ते गेले तर का गेले असं म्हणायचं आणि नाही गेले तर नास्तिक आहेत असं म्हणायचं." यावेळी अजित पवार यांनी माध्यमांनासुद्धा सुनावलं. ते म्हणाले की, "हे तुम्ही दाखवायचं बंद केलं की बोलणारेसुद्धा बंद होतील. असं बोलणाऱ्यांवर तुम्ही बॅन आणला पाहिजे."

अजित पवार जरी बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा. मिटकरी तर बाजूला राहु द्या. अनेक जण शाकाहार, मांसाहार करतात. मांसाहार करणारी व्यक्ती रस्त्याने निघाली असेल आणि कोणी म्हणलं एखाद्या ठिकाणी आपण दर्शनाला जाऊया. तर काही जण मनात ठेवतात कुणाला सांगत नाहीत. मात्र काही जण बोलून दाखवतात. त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायला हव्यात त्या मी केल्या नाहीत. केवळ मंदिरात जाऊन डोकं टेकलं तर खरं दर्शन, कधी कधी पंढरपूरला आपण पायरीचं दर्शन घेतो असं अजित पवार म्हणाले.

शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शरद पवार दर्शन घेतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्याआधी भीडे वाड्याची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच नमस्कार केला. राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षांनी यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत असं सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या