मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vadgav Mavl Murder : चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून दगडाने ठेचून खून; वडगाव मावळातील घटना

Vadgav Mavl Murder : चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून दगडाने ठेचून खून; वडगाव मावळातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 21, 2023 03:16 PM IST

Vadgav Mavl Murder : पुण्यात एका तरुणाचे किरकोळ वादातून त्याचे अपहरण करून त्याला वडगाव मावळ येथे नेत त्याचा खून केला.

 crime news
crime news

पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना वडगाव मावळ परिसरात उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला वडगाव मावळ येथे नेत त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी केवळ दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

सौरभ शैलेंद्र मयेकर (वय २१, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. सध्या रा. एक्झारबीया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (वय १८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटर मारल्याने तो जखमी झाला होता. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले.

त्याला वडगाव मावळ येथील ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीतील खापरे ओढ्याजवळ घेऊन जात त्यांनी सौरभला गंभीर मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर आरोपी पसार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला. दरम्यान, त्यांनी मोबाइल लोकेशनचा धार घेत केवळ दोन तासांत आरोपींना अटक केली.

IPL_Entry_Point

विभाग