मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Influenza H3N2: काय आहे सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा यातील फरक? ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Influenza H3N2: काय आहे सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा यातील फरक? ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2023 10:51 AM IST

Health Tips: इन्फ्लूएंझा विषाणू भारतात वेगाने पसरत आहे. त्यामुळे आतापर्यंत २ जणांना जीव गमवावा लागला आहे. सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा H3N2 च्या लक्षणांमध्ये काय फरक आहे ते येथे जाणून घ्या.

सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा यातील फरक
सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा यातील फरक (unsplash)

Symptoms and Prevention of Influenza H3N2: भारतात H3N2 मुळे दोन मृत्यू झाल्यानंतर लोकांची चिंता वाढली आहे. बदलत्या ऋतूत व्हायरल, सर्दी पसरणे सामान्य आहे. मात्र यावेळी सामान्य सर्दीऐवजी इन्फ्लूएंझा विषाणूचा H3N2 स्ट्रेन अडचणीचे कारण बनला आहे. भारतात ९० पेक्षा जास्त चाचण्या आढळल्या आहेत आणि त्याचा प्रसार वेगाने होत आहे. या फ्लूबाबत आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या व्हायरसमुळे होणाऱ्या संसर्गामध्ये ३ ते ५ दिवस ताप येत असून खोकला बराच काळ राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे जाणून घ्या खबरदारी म्हणून काय करावे.

सावधगिरी बाळगली नाही तर होऊ शकतो धोका

इन्फ्लूएंझा रुग्णांची लक्षणे सामान्य सर्दीच्या तुलनेत तीव्र असतात. त्यांना रुग्णालयात देखील दाखल करावे लागत आहे. हा आजार तितकासा गंभीर नाही, पण खबरदारी न घेतल्यास जीवालाही धोका होऊ शकतो. H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे बहुतेक लोकांमध्ये सारखीच असतात. हिंदुस्तान टाईम्सशी झालेल्या संवादात नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. जयलक्ष्मी यांनी काही गंभीर लक्षणे सांगितली आहेत.

श्वास घेण्यात अडचण: जर श्वास घेण्यात अडचण येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला न्यूमोनिया किंवा इतर काही समस्या आहेत.

सतत उलट्या होणे: उलट्या हे H3N2 इन्फ्लूएन्झाचे लक्षण आहे. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन देखील होऊ शकते.

कमी रक्तदाब: जर डिहायड्रेशन किंवा सेप्सिस असेल तर बीपी लो होऊ शकतो.

जलद श्वास घेणे: ऑक्सिजन कमी झाल्यामुळे श्वासोच्छवास जलद होऊ शकतो. हे देखील H3N2 गंभीर असण्याचे लक्षण आहे.

सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझा मधील फरक

- सामान्य सर्दीची लक्षणे हळूहळू दिसू लागतात. इन्फ्लूएंझाची लक्षणे अचानक दिसतात.

- सामान्य सर्दीमध्ये डोकेदुखी फार कमी प्रकरणांमध्ये होते तर इन्फ्लूएन्झाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये डोकेदुखी होते.

- सामान्य सर्दीमुळे खोकला होतो, तर इन्फ्लूएंझामुळे गंभीर खोकला होतो आणि तो अनेक आठवडे टिकतो.

- सामान्य सर्दीमध्ये अधूनमधून थकवा येतो. पण इन्फ्लूएन्झाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये थकवा येतो.

- सामान्य सर्दीमध्ये उलट्या आणि जुलाब होत नाहीत, तर इन्फ्लूएन्झा गंभीर असताना किंवा मुलांमध्येही लक्षणे दिसतात. (क्रेडिट CDC)

प्रतिबंध

व्हायरस आणि बॅक्टेरिया टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वच्छता राखणे. हा रिस्पिरेटरी व्हायरस असल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी जशी सावधगिरी बाळगली तशीच सावधगिरी बाळगली पाहिजे, जसे की गर्दीत न जाणे, हात धुणे, मास्क घालणे इ.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel