मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi 2023: धुलिवंदन साजरं करताना डोळ्यांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या तज्ञांकडून

Holi 2023: धुलिवंदन साजरं करताना डोळ्यांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या तज्ञांकडून

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 06, 2023 09:16 AM IST

Eye Care: होळी, धूलिवंदन साजर करताना डोळ्यांना दुखापती होण्याची शक्यता जास्त असते. डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून काय करावे? किंवा डोळ्यात रंग गेल्यास काय करावे? याबद्दल तज्ञांकडून जाणून घ्या.

eye care in holi
eye care in holi (Freepik)

होळी हा रंगांचा सण आहे आणि अशा आनंदाच्या सणादरम्यान देशभरात डोळ्यांना दुखापती होण्याचे प्रमाण वाढते हे दुर्दैवी आहे. दरवर्षी होळीदरम्यान किंवा त्यानंतर डोळ्यांच्या दुखापती झालेले हजारो रुग्ण रुग्णालयांमध्ये येतात. सणाचा आनंद व मजा यांचे रूपांतर काही जणांसाठी वेदना व दु:खामध्ये होणे दु:खद आहे. कृत्रिम रसायनांपासून तयार केलेल्या रंगांचा डोळे, त्वचा व शरीराच्या अन्य भागांवर किती वाईट परिणाम होतो याची माहिती अनेकांना नसते. बाजारात निकृष्ट दर्जाचे रासायनिक रंग विक्रीसाठी ठेवले जातात. त्याचा डोळ्यांवर हानीकारक परिणाम होतो आणि त्यामुळे काही दीर्घकालीन जटीलता निर्माण होऊन कायमस्वरूपी दृष्टी गमावण्यासारखे गंभीर परिणामही होतात.

ट्रेंडिंग न्यूज

रंगांचा सण होळी जवळ आला असताना, मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलमधील, तज्ञांनी रासायनिक रंग व पाण्याच्या फुग्यांचा वापर टाळण्याचे आवाहन, लोकांना केले आहे. “होळीचा सण डोळ्यांच्या दुखापती व डोळ्यांना कायमस्वरूपी होणाऱ्या ईजांमागील प्रमुख कारणांपैकी एक झाला आहे. लहान मुलांमध्ये विशेषत्वाने या दुखापती अधिक आढळतात. हा चिंतेचा विषय आहे”, असे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल्समधील क्लिनिकल सेवांच्या प्रादेशिक प्रमुख डॉ. वंदना जैन यांनी सांगितले.

आपण काही प्रतिबंधात्मक उपाय केले, तर होळीदरम्यान डोळ्यांना होणाऱ्या दुखापती टाळणे अगदीच शक्य आहे. आपली मुले रंग खेळताना कोणती उत्पादने वापरत आहेत याची जाणीव पालकांना असणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे आणि रंगांचा उत्सव सुरक्षित व संरक्षित मार्गाने कसा साजरा करावा याबद्दल त्यांच्या मित्रांशी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

डॉ. वंदना जैन, प्रादेशिक प्रमुख- क्लिनिकल सेवा, वाशी, डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल्स, यांच्यातर्फे तज्ञ सल्ला.

सेंद्रीय आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा!

आता बाजारामध्ये सेंद्रीय रंग किंवा फुले, हळद व अन्य सेंद्रीय उत्पादनांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे रंग असे अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हे रंग आपल्या शरीरासाठी नुकसानकारक नसतात.

पाण्याचे फुगे वापरू नका!

पाण्याचे फुगे डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान करणाऱ्या दुखापतींना कारणीभूत ठरतात. पाण्याच्या फुग्याचा आघात झाल्यामुळे डोळ्यांतून रक्तस्राव होणे, लेन्स निखळणे आणि रेटिना (नेत्रपटल) भंगण्यासारख्या दुखापती होऊ शकतात. या दुखापती सामान्यपणे गंभीर स्वरूपाच्या असतात आणि यातून कायमचे अंधत्व येऊ शकते.

डोळ्यात चुकून रंग गेल्यास, ते चोळू नका!

डोळे चोळल्यामुळे पारपटलावर (कॉर्निया) ओरखडे येऊ शकतात किंवा पारपटलाची हानी होऊ शकते. ह्यामुळे डोळ्यांना संसर्ग व अन्य गुंतागुंतीही होऊ शकतात. जर डोळ्यात चुकून रंग गेला, तर तत्काळ हात साबणाने स्वच्छ धुवा. त्यानंतर ओंजळीत पाणी भरून घ्या आणि डोळा या पाण्यात हलकेच बुडवा. डोळ्यांवर पाण्याचे शिपके मारणे टाळा. कारण, त्यामुळे दुखापत आणखी गंभीर होऊ शकते. डोळ्यांत गेलेले सुक्ष्म घटक काढण्यासाठी रुमाल किंवा टिश्यूपेपर वापरणेही योग्य नाही. कारण, त्यामुळे दुखापत आणखी वाढू शकते.

रंग खेळण्यापूर्वी कॉण्टॅक्ट लेन्सेस काढून ठेवा!

कॉण्टॅक्ट लेन्समध्ये बाष्प शोषून घेण्याचे म्हणजेच हायग्रोस्कोपिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्यामध्ये पाणीही सहज शोषले जाते. म्हणून, डोळ्यांत कोणताही रंग गेल्यास अॅलर्जी व प्रादुर्भावांचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणजे रंग खेळताना चष्मा घालणे किंवा डिसपोजेबल कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरणे. डोळे चुरचुरल्यास या कॉण्टॅक्ट लेन्सेस तत्काळ बाद केल्या जाऊ शकतात.

स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नका!

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या मनाने औषधे घेणे टाळा. डोळ्याला दुखापत झाल्याचे किंवा डोळ्याला हानी पोहोचल्याचे काही लक्षण जाणवत असेल, तर तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांना भेटा. आपण भारतीय नेहमीच घरगुती उपाय करून बघतो किंवा उपलब्ध असलेले कोणतेही आय ड्रॉप्स किंवा ऑइंटमेंट डॉक्टरांचा सल्ला न घेता, डोळ्यांत घालतो. यामुळे दुखापत बरी होण्याऐवजी अधिक गंभीर झाल्याचेच प्रकार बहुतेकदा घडतात. डोळे सतत लाल होत असतील, त्यांतून पाणी येत असेल, खाज सुटत असेल, चुरचुर होत असेल, आघात झाला असेल किंवा रक्तस्राव होत असेल, तर तातडीने नजीकच्या नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवावे.

WhatsApp channel

विभाग