मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Year End 2022: ऐतिहासिक कथांनी गाजवलं मनोरंजन विश्व; मराठी चित्रपटांसाठी कसं होतं २०२२ वर्ष?

Year End 2022: ऐतिहासिक कथांनी गाजवलं मनोरंजन विश्व; मराठी चित्रपटांसाठी कसं होतं २०२२ वर्ष?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 30, 2022 10:21 AM IST

Year End 2022: सरत्या वर्षात एकीकडे बॉलिवूड चित्रपट बॉयकॉट होत असताना, दुसरीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत होता.

Marathi Movie released in 2022
Marathi Movie released in 2022

Year End 2022: वर्ष संपायला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. या दरम्यान सगळेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तब्बल दोन वर्ष कोरोनाशी झुंज दिल्यानंतर २०२२ या वर्षात अनेकांनी पुन्हा एकदा नव्याने भरारी घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान मनोरंजन विश्व देखील नव्याने उभारी घेत होते. एकीकडे बॉलिवूड चित्रपट बॉयकॉट होत असताना, दुसरीकडे मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत होता. सरत्या वर्षात अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कल्ला केला.

सरत्या वर्षात प्रेक्षकांनी प्रेमकथा आणि अॅक्शन चित्रपटांपेक्षा ऐतिहासिक कथानक असणाऱ्या चित्रपटांना विशेष पसंती दर्शवली. २०२२मध्ये मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर उचलून धरले. ‘पावनखिंड’, ‘हर हर महादेव’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा या ऐतिहासिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस चांगलेच गाजवले. तर, यावर्षी मराठी मनोरंजन विश्वात चांगले प्रयोग देखील केले गेले. काही चित्रपटांमधून प्रेरणादायी कथा दाखवली गेली, तर काहींमध्ये हॉलिवूडप्रमाणे सायफाय कथा पाहायला मिळाल्या. मात्र, सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

‘पावनखिंड’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘चंद्रमुखी’, ‘लोच्या झाला रे’, ‘टाईमपास ३’, ‘झोम्बिवली’, ‘हर हर महादेव’, ‘शेर शिवराज’ हे चित्रपट सरता वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातील बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तर, काही चित्रपटांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं. यावर्षी बॉलिवूड चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे, असे म्हणता येईल.

छत्रपती शिवाजी महराजांच्या इतिहासातील बाजीप्रभू यांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. हा चित्रपट प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडला होता. ‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४३ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर, रिलीज झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने जवळपास ३० कोटींची कमाई केली होती. तर, ‘झोम्बिवली’ या मराठी झॉम्बिपटाचा प्रयोग देखील प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा दिसला.

IPL_Entry_Point