Oscar 2023 : आपण आजवर अनेक पुरस्कार सोहळे टीव्हीवर किंवा लाइव्ह पाहिले आहेत. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये मंचावर असणाऱ्या व्यक्तीचा हातात सीलबंद पाकीट असते. ती व्यक्ती ते पाकीट सर्वांसमोर फोडते आणि विजेत्याचे नाव घोषित करते. पण तोपर्यंत विजेत्याचे नाव हे गुपित ठेवले जाते. विजेत्याचे नाव ज्या कागदावर लिहिलेले असते तो कागद ठेवलेले पाकीट सीलबंद का असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया त्या मागचे कारण...
मनोरंजन क्षेत्र, काही क्रीडा क्षेत्रातील, काही साहित्य, तर काही विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सोहळे आपण पाहिले आहेत. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानचिन्ह देऊन गौरविले जाते. पण सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साम्य असणारी गोष्ट म्हणजे एक व्यक्ती मंचावर सीलबंद पाकीट उघडून विजेत्याचे नाव घोषित करते. पुरस्कार सोहळ्यांमधील विजेत्यांचं नाव सीलबंद पाकिटात गुप्त ठेवण्याचा जो प्रकार आहे ना, त्याची सुरुवात केली ती ऑस्करनेच.
पहिला ऑस्कर सोहळा हा १९२९ साली पार पडला. पण या सोहळ्याची उत्सुकता मात्र कुणामध्ये पाहायला मिळाली नाही. त्याचं कारण म्हणजे विजेत्यांची नावे जवळपास तीन महिने आधीच घोषीत करण्यात आली होती. त्यानंतर दिग्दर्शक सेड्रिक गिब्जने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी शक्कल लढवली. विजेत्यांची नावे घोषीत करण्यापूर्वी पाच संभाव्य विजेत्यांची नावे जाहीर केली. त्याला आज आपण नॉमिनेशन असे म्हणतो. या पाच स्पर्धकांची जाहिरात करायची आणि पुरस्कार सोहळ्याची दिवशी विजेत्याचे नाव घोषित करायचे अशी कल्पना मांडली. ऑस्कर समितीच्या सर्व सभासदांना ती कल्पना आवडली देखील. त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची. जेणेकरून जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढेल.
१९४१ साली यात पुन्हा बदल करण्यात आला. वृत्तमाध्यमांना देण्यात येणारी विजेत्यांची यादी बंद करण्यात आली. विजेत्यांची नावे ही मंचावर असणाऱ्या व्यक्तीच्या सीलबंद पाकीटात गुपित ठेवण्यात येऊ लागली. ते पाकीट फोडल्यानंतरच विजेत्याचे नाव समोर येऊ लागले. हे सर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तेव्हापासून प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात विजेत्याचे नाव हे सीलबंद पाकीटात ठेवण्यात येऊ लागले.