मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik: दोन दिवसांपूर्वीच साजरी केली मित्रांसोबत होळी; सतीश कौशिक यांचे अखेरचे ट्वीट व्हायरल

Satish Kaushik: दोन दिवसांपूर्वीच साजरी केली मित्रांसोबत होळी; सतीश कौशिक यांचे अखेरचे ट्वीट व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 09, 2023 09:51 AM IST

Satish Kaushik Last Tweet: सतीश कौशिक त्यांच्या अखेरच्या ट्वीटमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत होळी आणि धुळवड साजरी करताना दिसले होते.

Satish Kaushik
Satish Kaushik

Satish Kaushik Last Tweet: बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज (९ मार्च) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र, अभिनेते अनुपम खेर यांनी ही दुखःद बातमी सोशल मीडियावरून शेअर केली. चाहत्यांसह कलाकार आपल्या लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान सतीश कौशिक यांचे अखेरचे ट्वीट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सतीश कौशिक यांनी त्यांचे शेवटचे ट्वीट ७ मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री उशिरा केले होते. या ट्वीटमध्ये सतीश कौशिक आपल्या मित्रपरिवारासोबत होळीच्या रंगात धमाल करताना दिसले होते. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील या पोस्टमध्ये चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सतीश कौशिक यांच्यासोबत रिचा चढ्ढा, अली फजल, जावेद अख्तर आणि महिमा चौधरी दिसत आहेत. सतीश यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, यावेळी होळी जुहू येथील जानकी कुटीर येथे खेळली गेली. ही होळी पार्टी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी आयोजित केल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. या ट्विटद्वारे त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सतीश कौशिक यांना फोटोंमध्ये हसताना पाहून आता चाहत्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू तरळले आहेत.

सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, ‘मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्रासाठी कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही.’

अनुपम खेर व्यतिरिक्त अभिनेत्री कंगना रनौत, मधुर भांडारकर यांसारख्या अनेक स्टार्सनी ट्विट करून सतीश कौशिक श्रद्धांजली वाहिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग