मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Khan: आर्यन खानला मिळालेल्या क्लीन चीटविरोधातील याचिका मागे; शाहरुखच्या लेकाला मोठा दिलासा!

Aryan Khan: आर्यन खानला मिळालेल्या क्लीन चीटविरोधातील याचिका मागे; शाहरुखच्या लेकाला मोठा दिलासा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 22, 2022 07:35 AM IST

Aryan Khan: ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला क्लीन चीट देण्यात आली होती. यानंतर आर्यनच्या क्लीन चीट विरोधात देखील याचिका दाखल करण्यात आली होती.

Aryan Khan
Aryan Khan

Aryan Khan Drugs Case: गेल्या वर्षातील ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यन खान याचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, संपूर्ण चौकशीनंतर या प्रकरणात आर्यन खान याला क्लीन चीट देण्यात आली होती. यानंतर आर्यनच्या क्लीन चीट विरोधात देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता कोर्टाच्या आदेशानंतर ही याचिका मागे घेण्यात आली आहे. वकिलीच शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आर्यन खान याला मिळालेल्या क्लीन चीट विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांच्या खंडपीठाच्या आदेशानंतर ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यावर बोलताना आर्यन खान याचे वकील सुबोध पाठक म्हणाले की, क्लीन चीट देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे, तपास यंत्रणेला नाही. पाठक यांनी असा युक्तिवाद केला की, एसआयटीने जे काही पुरावे आहेत ते संबंधित न्यायाधीशांसमोर सादर करायला हवे होते. कोर्टाने यावर उत्तर देताना म्हतके की, ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने संबंधित याचिकाकर्त्याला याचिकेचे स्थान आणि जनहित विचारले. कायद्याचे विद्यार्थी असल्याने आपण जनहित याचिका चांगल्या कारणासाठी वापरावी, असे देखील खंडपीठाने म्हटले आहे. कोर्टाच्या या कडक टिप्पणीनंतर दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सदर ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले होती. याप्रकरणी चौकशीनंतर आर्यन खानसह अनेकांना एनसीबीने अटक केली होती. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला. मात्र, नंतर आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती.

सध्या आर्यन खान त्याच्या बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच एका स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्याने याची माहिती चाहत्यांना दिली होती. लवकरच तो लेखक-दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय त्याने स्वतःची एक कंपनी देखील सुरू केली असून, व्यवसाय क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे.

IPL_Entry_Point

विभाग