मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’च्या ओटीटी रिलीज बाबतीत मोठा निर्णय; शाहरुखच्या चित्रपटात होणार ‘हे’ बदल!

Pathaan: ‘पठाण’च्या ओटीटी रिलीज बाबतीत मोठा निर्णय; शाहरुखच्या चित्रपटात होणार ‘हे’ बदल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 17, 2023 07:38 AM IST

Pathaan: शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यात काही बदल करण्यात आले आहेत.

Pathaan
Pathaan

Pathaan OTT Release: दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रीप्शन यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. दृष्टिहीन लोकांना देखील OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेता यावा, यासाठी हे बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीएफसीला पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास देखील सांगितले आहे.

चित्रपटाचे प्रदर्शन तोंडावर आल्याने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याबाबत न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट एप्रिलमध्ये ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. त्यामुळे, ओटीटी व्हर्जनमध्ये काही बदल करणे शक्य आहे. केवळ सामान्य प्रेक्षकाच नव्हे, तर दृष्टिहीन लोकांना देखील शाहरुख खानच्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. अर्थात हे बदल चित्रपटाच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि २०२३मधील पहिला मोठा चित्रपट आहे.

‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा अॅक्शन स्पाय चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेता जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळाले आहेत. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खानने सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसली आहे. दीपिका देखील हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point