Sameer Khakhar Passes Away:दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत ‘खोपडी’ ही व्यक्तिरेखा साकारून घराघरांत प्रसिद्ध झालेले अभिनेते समीर खाखर यांचे आज (१५ मार्च) निधन झाले.'पुष्पक', 'शहेनशाह', 'रखवाला', 'दिलवाले', 'राजा बाबू'यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये समीर खक्कर झळकले आहेत. मात्र, १९९६मध्ये त्यांनी अभिनय कारकिर्दीला राम राम ठोकून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेत ते जावा कोडर म्हणून नोकरी करत होते.
समीर खाखर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. काल (१५ मार्च) दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यानंतर समीर यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
समीर खक्कर यांनी'नुक्कड' या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘खोपडी’ ही भूमिका तुफान गाजली. त्यानंतर समीर दूरदर्शनच्या'सर्कस' या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले होते. समीर यांनी ‘डीडी मेट्रो’च्या'श्रीमान श्रीमती' या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिका साकारली होती. तर,'संजीवनी' या लोकप्रिय मालिकेत ते ‘गुड्डू माथूर’ची भूमिका साकारताना दिसले होते. काही वर्षांपूर्वी ते'हसी तो फसी', 'जय हो', 'पटेल की पंजाबी शादी' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकले होते.