मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhola: अजय देवगणच्या 'भोला'मुळे नागराज मंजुळेंचा मोठा निर्णय? 'घर बंदूक बिरयानी'चे प्रदर्शन लांबणीवर

Bhola: अजय देवगणच्या 'भोला'मुळे नागराज मंजुळेंचा मोठा निर्णय? 'घर बंदूक बिरयानी'चे प्रदर्शन लांबणीवर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2023 08:26 AM IST

Ghar Banduk Biryani: नागराज मंजुळे यांनी 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. त्यामागे नक्की काय कारण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

घर बंदुक बिर्याणी
घर बंदुक बिर्याणी (HT)

‘सैराट’, ‘नाळ’ आणि ‘झुंड’च्या यशानंतर दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे यांनी 'घर बंदूक बिर्याणी' या आगामी चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. ‘घर बंदूक बिर्याणी’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे समोर आले आहे.

नागराज मंजुळे यांनी 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहिर केली. पण प्रदर्शनाची तारीख पुढे का ढकलली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे नागाराज यांनी त्यांच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: लावणी स्टार गौतमी पाटीलचा पुण्यातील कार्यक्रम रद्द, काय आहे कारण?

काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ७ एप्रिल रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point