मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved: ‘वेड’ पाहण्यासाठी रितेशनं शर्मिला ठाकरेंना फोन केला आणि नंतर जे घडलं ते सगळंच भन्नाट होतं!

Ved: ‘वेड’ पाहण्यासाठी रितेशनं शर्मिला ठाकरेंना फोन केला आणि नंतर जे घडलं ते सगळंच भन्नाट होतं!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2023 03:36 PM IST

Ved Movie: ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी रितेश देशमुख याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना फोन केला होता. यानंतर जे घडलं ते सगळचं भन्नाट होतं.

Ved Marathi Movie
Ved Marathi Movie

Ved Movie: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘वेड’ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. या दरम्यान रितेश देशमुख याने एका मुलाखतीत चित्रपटाशी संबंधित एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी रितेश देशमुख याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना फोन केला होता. यानंतर जे घडलं ते सगळचं भन्नाट होतं.

‘वेड’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून रितेश आणि जिनिलीया दोघंही भारावून गेले आहेत. दरम्यान रितेशने देखील आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. एका मुलाखतीत रितेशने प्लाझा चित्रपटगृहाच्या आठवणी सांगताना ‘वेड’चा एक भन्नाट किस्सा देखील सांगितला. रितेश म्हणाला, ‘राज ठाकरे हे नेहमीच मराठी चित्रपटांचं कौतुक करतात. त्यांचा नेहमीच सगळ्या कलाकारांना पाठिंबा असतो. सध्या ते कामात खूप व्यस्त आहेत. म्हणूनच मी शर्मिला वहिनींना वेड पाहण्यासाठी फोन केला होता.’

रितेश किस्सा सांगताना म्हणाला की, ‘शर्मिला वहिनींना मी चित्रपट कधी बघायचा हे विचारण्यासाठी फोन केला तेव्हा, त्यांनी मला सांगितलं की, तू जो शो म्हणत होतास त्यासाठी मी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे. हे ऐकून मी खूप भारावून गेलो. बालपणी आई वडिलांसोबत आम्ही कधीतरी प्लाझामध्ये चित्रपट बघायचो. पण आज माझ्या चित्रपटासाठी शर्मिला ठाकरे आणि अविनाश खोपकर यांनी संपूर्ण थिएटरच बुक केलं.’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील ‘वेड’ या चित्रपटाचं आणि रितेश- जिनिलीया या जोडीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. याविषयी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी देखील जिनिलीयाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. जिनिलीयाने आणखी चित्रपट करावेत आणि मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सक्रिय व्हावं, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

IPL_Entry_Point