मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahnawaz Pradhan: ‘मिर्झापूर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ५६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shahnawaz Pradhan: ‘मिर्झापूर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ५६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 18, 2023 08:28 AM IST

Shahnawaz Pradhan passes away: शाहनवाज प्रधान यांनी ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैय्या’च्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती.

Shahnawaz Pradhan
Shahnawaz Pradhan

Shahnawaz Pradhan passes away: बॉलिवूडच आणि मालिकाच नव्हे, तर आपल्या अभिनयाने ओटीटी विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेता शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले. अवघ्या ५६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनेते शाहनवाज प्रधान एका सत्कार समारंभाला गेले होते. या कार्यक्रमादरम्यान अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

हृदयविकाराच्या झटक्याने शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. शाहनवाज प्रधान यांनी ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैय्या’च्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. ते श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांचे वडील ‘परशुराम गुप्ता’ हे पात्र साकारत होते. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये शाहनवाज यांच्यासोबत काम केलेले अभिनेते राजेश तैलंग यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राजेश तैलंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटले की, ‘शाहनवाज भाऊला शेवटचा सलाम!!! किती अप्रतिम माणूस होतास आणि किती अप्रतिम अभिनेता होतास.... मिर्झापूर दरम्यान मी तुझ्यासोबत किती चांगला वेळ घालवला होता. या बातमीवर विश्वास बसत नाहीय.’

शाहनवाज प्रधान यांचा जन्म उडीसामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह रायपूरला स्थायिक झाले. शाळेत असताना त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर सादरीकरण केले होते. इथूनच त्यांच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली होती. शाहनवाज ८०च्या दशकांतही लोकप्रिय झाले होते. त्यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या ‘श्री कृष्ण’ या शोमध्ये नंदाची भूमिका साकारली होती. यानंतर ते ‘अलिफ लैला’ या मालिकेमध्येही झळकले होते. ‘द फॅमिली मॅन’, ‘रईस’, ‘खुदा हाफिज’ या सारख्या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज प्रधान यांच्यावर आज म्हणजेच शनिवारी (१८ फेब्रुवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.

IPL_Entry_Point