मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Subodh Bhave: मराठमोळा अभिनेता सुबोध भावे बनणार ‘बिरबल’; मुघलांवर आधारित ‘या’ सीरिजमध्ये झळकणार!

Subodh Bhave: मराठमोळा अभिनेता सुबोध भावे बनणार ‘बिरबल’; मुघलांवर आधारित ‘या’ सीरिजमध्ये झळकणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 15, 2023 06:20 PM IST

Subodh Bhave as a Birbal : ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या वेब सीरिजमध्ये सुबोध भावे ‘बिरबला’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Subodh Bhave
Subodh Bhave

Subodh Bhave as a Birbal : छोटा पडदा असो वा मोठा पडदा अभिनेता सुबोध भावे याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता लवकरच तो चतुर बिरबलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या वेब सीरिजमध्ये सुबोध भावे ‘बिरबला’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नुकतीच या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

काँटिलो डिजिटलद्वारे प्रस्तुत ‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’मध्ये नसीरुद्दीन शाह, धर्मेंद्र, अदिती राव हैदरी, आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काँटिलो डिजिटलने शोरनर विल्यम बोर्थविक, लेखक सायमन फँटोझो आणि दिग्दर्शक रोनाल्ड स्कॅल्पेलो यांच्यासोबत मिळून या सीरिजची निर्मिती केली आहे. मुघल साम्राज्याच्या आसमंतात रंगलेली वारसानाट्यं या सीरिजमधून उलगडली जाणार आहेत.

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या सीरिजमध्ये सम्राट अकबराचा कार्यकाळ दाखवण्यात आला आहे. आपल्या भव्यदिव्य गादीसाठी पात्र वारसाच्या शोधातील अकबर यात दाखवण्यात येणार आहे. अकबरानंतरच्या पिढ्या कशा उदयाला आल्या व त्यांचे पतन कसे झाले, हे या वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये मुघल घराण्याची शान व क्रौर्य या दोन्ही बाजू दाखवण्यात येणार आहेत. मुघलांना कला, काव्य व स्थापत्याबद्दल वाटणारे प्रेम आणि त्याच वेळी सत्तेसाठी स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांबाबत थंड डोक्याने त्यांनी घेतलेले निर्णय यावर देखील प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’मध्ये कलावंतांची तगडी फौज दिसणार आहे. अकबराच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह, तर अनारकलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी आहे. शहजादा सलीमच्या भूमिकेत आशीम गुलाटी, शहदाजा मुरादच्या बूमिकेत ताहा शाह आणि शहजादा दानियालच्या भूमिकेत शुभम कुमार मेहरा आहे. राणी जोधाबाईच्या भूमिकेत संध्या मृदुल, राणी सलीमाच्या भूमिकेत झरीना वहाब, मेहरुन्नीसाच्या भूमिकेत सौरसेनी मैत्रा आहे. राहुल बोस मिर्झा हकीमची भूमिका करत आहे, तर धर्मेंद्र शेख सलीम चिस्ती यांच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत सुबोध भावे, आयाम मेहता, दीपराज राना, शिवानी टांकसाळे, पद्मा दामोदरन, पंकज सारस्वत, दिगंबर प्रसाद आणि झकारी कॉफिन सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

WhatsApp channel