Khurchi Marathi Movie: ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुर्ची’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. आता या ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. प्रेक्षकांची आतुरता पाहून नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘खुर्ची’ चित्रपटाच्या रिलीज डेटसोबतच आता या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर देखील सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसला आहे. तर, लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे. पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणं ऐकू येत आहेत. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे. ढोल ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीतही ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र सोन्यासारखी चमचमत आहे. अगदी राजेशाही असा या खुर्चीचा थाट आहे. याच ‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खुर्चीसोबतच ‘आता खुर्ची आपलीच’ म्हणत चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.
‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, आर्यन, राकेश बापट,अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेत्री आराधना शर्मा यांच्या विशेष भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.
संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे आणि योगिता गवळी यांनी बरोबरीने सांभाळली आहे. ‘खुर्ची’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळला आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासदांचे प्रेम, प्रचार याचे वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे.