मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yo Yo Honey Singh : यशाच्या शिखरावर असतानाच अचानक बुडालेलं हनी सिंहचं करिअर! नेमकं काय झालं?

Yo Yo Honey Singh : यशाच्या शिखरावर असतानाच अचानक बुडालेलं हनी सिंहचं करिअर! नेमकं काय झालं?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 15, 2023 08:26 AM IST

Happy Birthday Yo Yo Honey Singh: यूट्यूबमधून करिअरची सुरुवात करणारा हनी सिंह एकेकाळी इंटरनेट सेन्सेशन बनला होता.

Yo Yo Honey Singh
Yo Yo Honey Singh

Happy Birthday Yo Yo Honey Singh: आपल्या म्युझिकने देशभरातच नव्हे, तर जगभरात नाव कमावणारा प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह आज (१५ मार्च) आपला ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेल्या यो यो हनी सिंहचे खरे नाव हिरदेश सिंह आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. रॅपिंग इंडस्ट्रीत आल्यावर स्टेज परफॉर्मन्ससाठी त्याने आपले नाव बदलून ‘यो यो हनी सिंह’ असे ठेवले. यूट्यूबमधून करिअरची सुरुवात करणारा हनी सिंह एकेकाळी इंटरनेट सेन्सेशन बनला होता. मात्र, त्याच्या आयुष्यात एक असा काळ आला, ज्याने त्याचे संपूर्ण करिअर पणाला लागले.

गायक हनी सिंह याचा जन्म दिल्लीत झाला होता. हनीने यूकेमधील ट्रिनिटी स्कूलमध्ये संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर दिल्लीत आल्यावर त्याने रॅपिंग सुरू केले होते. जेव्हा लोकांनी हनी सिंहचा रॅप पहिल्यांदाच ऐकला, तेव्हा लाखो लोक त्याचे चाहते झाले. हनी सिंहने दिलजीत दोसांझसोबत 'लक २८ कुडी दा' हे गाणे गायले होते. त्यांचे हे गाणेही सुपरहिट ठरले होते.

'शकल पे मत जा' या चित्रपटात गायलेल्या डेब्यू गाण्याने हनी सिंहला बॉलिवूडमध्ये नवी ओळख मिळाली. 'मस्तान' चित्रपटातील गाण्यासाठी त्यावेळी त्याला ७० लाख रुपये देण्यात आले होते. त्याने गायलेले ‘अंग्रेजी बीट’ हे गाणे सैफ अली खानच्या 'कॉकटेल' चित्रपटात घेण्यात आले होते. हनी सिंह आणि दिलजीत सिंहचे 'लक २८ कुडी दा' हे गाणे बीबीसी डाऊनलोड चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि 'बॉस' या चित्रपटातील गाण्यांमधून यो यो हनी सिंह याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. हनीचे 'लुंगी डान्स' हे गाणे अक्षरशः लोकांच्या जिभेवर रुळले.

हनी सिंह त्याच्या प्रसिद्धीच्या शिखरावर होता आणि त्याचवेळी त्याच्या आयुष्यात वाद सुरू झाले. त्याच्या काही गाण्यांच्या बोलांवर लोकांनी आक्षेप घेतला. त्याच्यावर अनेक राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, हनी सिंह बॉलिवूडमधून अचानक गायब झाला. या काळात त्याने खूप दारू पिण्यास सुरुवात केली होती. त्याचे व्यसन इतके वाढले की, उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात दाखल करावे लागले.

मात्र, नंतर हनी सिंहने या सर्व गोष्टी अफवा असल्याचे म्हटले होते. ‘मी बायपोलर डिसऑर्डरशी लढत आहे. हे सर्व १८ महिने चालले, त्या दरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधे माझ्यावर काम करत नव्हती. माझ्यासोबत विचित्र गोष्टी घडत होत्या. बायपोलर डिसऑर्डर हा एक गंभीर मानसिक आजार आहे’, असे त्याने म्हटले होते. मात्र, या सगळ्यातून सावरत त्याने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात दमदार पुनरागमन केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग